आठवडय़ाची मुलाखत : एस. के, गुप्ता प्रकल्प संचालक, एमएमआरसी

कारशेडसाठी लागणाऱ्या आरेमधील जमिनीचा प्रश्न, प्रकल्प उभारणीसाठी करावी लागणारी बेसुमार वृक्ष व कांदळवनांची तोड, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आदींमुळे मेट्रो-३ हा मुंबईतील भुयारी मार्ग जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. २३,१३६ कोटींचा हा प्रकल्प मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानचा ३३.५ किमी इतका मार्ग कवेत घेणार आहे. प्रकल्पाभोवती विविध वाद घोंगावत असले तरी आतापर्यंत या प्रकल्पाचे १० टक्के इतके काम पूर्ण करण्यात ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ला (एमएमआरसी) यश आले आहे. या प्रकल्पाबाबत संचालक एस. के. गुप्ता यांच्याशी केलेली बातचीत..

’ सुरुवातीपासूनच ‘मेट्रो-३’चे कामात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे काम कितपत पुढे सरकले आहे?

अडथळे येत असले तरी प्रकल्पाचे काम थांबलेले नाही. आझाद मैदान, कफ परेड, नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक, नया नगर, विद्यानगरी, सहार रोड, पाली मैदान, सारीपूत नगर येथे लाँचिंग शाफ्टला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरमध्ये या ठिकाणांहून मुंबईच्या पोटात भुयारीकरणाच्या कामास सुरुवात होईल. त्यासाठी लागणाऱ्या १७ टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) चीनहून मागविण्यात येत आहेत. सध्या आम्ही त्याच कामात गुंतलो आहोत. मेट्रो-३च्या कामात हे अजस्र यंत्र महत्त्वाची भूमिका बजावणारे ठरेल. प्रत्यक्ष भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याआधी आवश्यक तिथे पर्जन्यवाहिन्या, जलवाहिन्या, दूरध्वनी, इंधनवाहिन्या हलविण्याचे काम करावे लागणार आहे. त्यापैकी महालक्ष्मी येथील जलवाहिनी हलविणे हे मोठे जिकिरीचे असणार आहे. ही कामे ऑक्टोबपर्यंत मार्गी लावली जातील.

’ वाहतुकीची कोंडी हा मुंबईला भेडसावणारा मोठा प्रश्न आहे. त्यात मेट्रो-३चे काम मुंबईतील अगदी दाटीवाटीच्या, गजबजलेल्या ठिकाणी पुढील काही वर्षे सुरू राहणार आहे. या काळात वाहतूक कोंडीचा मोठा त्रास मुंबईकरांना सहन लागणार नाही का?

दाटीवाटीच्या ठिकाणी हे काम सुरू राहणार असले तरी मुंबईकरांना कामामुळे कमीत कमी त्रास करावा लागेल. जिथे आम्ही स्थानकाचे काम सुरू केले आहे, तिथे पदपथ चालण्याकरिता उपलब्ध नसतील. म्हणूनच कायमचे लोखंडी अडथळे उभारून पादचाऱ्यांकरिता सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला आहे. वाहतूक पोलिसांखेरीज कंत्राटदारांचे मार्शल वाहतुकीची स्थिती हाताळतील. त्यामुळे वाहतूक कोंडी फारशी होणार नाही. तसेच काही ठिकाणी स्थानकांच्या कामाकरिता रस्त्यांवर खड्डे खोदावे लागणार आहे. मात्र, या ठिकाणी स्टीलचे तात्पुरते पूल उभारून वाहतूक सुरळीत केली जाईल. दादर, शितलादेवी, ग्रँट रोड, हुतात्मा चौक आदी ठिकाणी हे पूल उभारावे लागणार आहेत. वाहनांच्या दोन रांगा एका वेळेस या पुलांवरून जातील इतकी त्यांची क्षमता आहे.

’ मेट्रो-३च्या कामात मुंबईतील इमारती किंवा इतर आस्थापने अडचणीची ठरणार आहेत का?

काही ठिकाणी जिथे रस्ता चिंचोळा आहे, त्या ठिकाणी आम्हाला काही इमारतींचे पुनर्वसन करावे लागणार आहे. खासकरून गिरगाव, काळबादेवी परिसरात. या शिवाय मेट्रो-३ महालक्ष्मीला रेल्व रुळाखालून जाणार आहे. तसेच, अन्यही काही ठिकाणी रेल्वेने मेट्रो-३ला जागा देऊ केली आहे. त्या बदल्यास मेट्रो-३ने रेल्वेला ४४ कोटी रुपये देऊ केले आहेत.

’ कुलाबा ते सीप्झ या मार्गाने जाणाऱ्या मेट्रो-३चा इतर मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना काय उपयोग?

मेट्र-३चे एक स्थानक आझाद मैदानाखाली असेल. याला कामा रुग्णालय आणि पालिका मुख्यालयासमोर दोन प्रवेशद्वार असतील. हे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनसला भुयारी मार्गाने जोडले जाईल. त्यामुळे मध्य व हार्बर मार्गावरील प्रवाशांना ते सोयीचे पडेल. या शिवाय मेट्रोला रेल्वे, एसटीचीही जोड मिळणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकाला मेट्रो-३चे एक स्थान जोडले जाणार आहे. त्या करिता रेल्वेने या प्रकल्पाला जागा देऊ केली आहे. तसेच, एसटीच्या येथील आगाराशीही मेट्रो-३ जोडली जाणार आहे. त्यामुळे हे ठिकाण प्रवाशांकरिता सोयीचे ठरेल.

’ मेट्रो-३च्या कामामुळे होणारी वृक्षतोड, ताब्यात घेण्यात आलेली मोकळी मैदाने, वाहतूक कोंडी याबाबत दक्षिण मुंबईत रहिवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याबाबत तुमचे काय म्हणणे आहे?

वाहतूक कोंडी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच आझाद, ओव्हल मैदान ही मोकळी मैदाने आम्ही ताब्यात घेतली आहेत. मात्र, या ठिकाणी स्थानकांची कामे पूर्ण झाल्यानंतर हा परिसर पूर्वीसारखा केला जाईल. त्यामुळे रहिवाशांनी निश्िंचत राहावे. वृक्षतोडीला विरोध होत असला तरी आपण दररोज रेल्वेच्या गर्दीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीविताचाही विचार करायला हवा. पर्यावरणाचे संवर्धन वृक्ष लागवडीबरोबरच इंधनाच्या वापरावर मर्यादा आणूनही करता येते. मेट्रोमुळे ५.५४ लाख वाहनांच्या फेऱ्या कमी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दुसरे म्हणजे या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईलाच तिचे गतवैभव परत मिळणार आहे, हे येथील रहिवाशांनी लक्षात घ्यायला हवे.

-रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com