बिया रोवलेल्या राख्यांचे बाजारात आगमन; तिरंगी झेंडय़ांमध्येही बियांचा वापर
मातीत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी तिच्यात रुजवलेल्या बियांना पाणी घालून रोप बहरवण्याचा प्रकार अलीकडे नागरिकांच्या पसंतीस उतरत असताना आता स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन या सणांमधूनही पर्यावरण संतुलनाचे बीज पसरवण्यास सुरुवात झाली आहे. टोमॅटो, मिरची, चंदन, तुळस अशा बिया रोवलेल्या राख्या आणि तिरंगी झेंडे यंदा बाजारात उपलब्ध झाले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून निरनिराळ्या फळा-फुलांच्या बियाणे ठाकलेल्या मातीच्या गणेशमूर्तीची निर्मिती होत आहे. विर्सजनावेळी मूर्ती समुद्रात विसर्जित करण्याऐवजी घरातील मातीने भरलेल्या कुंडीत ठेवून त्यावर पाणी ओतले जाते. त्यानंतर मूर्ती मातीत पूर्णपणे विरघळल्याने त्यातील बिया रुजून रोप उगवते. याच पाश्र्वभूमीवर वृक्षारोपणाचा संदेश देणारे झेंडे आणि राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.
दिल्लीच्या रहिवासी कृतिका सक्सेना यांनी टॉमेटो आणि मिरचीच्या बिया रोवलेल्या कापडी झेंडय़ांची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पेहरावावर लावल्या जाणाऱ्या लहान कागदी झेंडय़ांना केंद्रस्थानी ठेवून अशा पद्धतीचे झेंडे त्यांनी तयार केले आहेत. आकाराने २ ते ३ इंच असलेल्या या झेंडय़ांची किंमत ८ रुपये प्रति झेंडा एवढी आहे. ‘मी स्वत: पर्यावरणवादी असल्यामुळे वृक्षलागवडीचा संकल्प ठरवून या झेंडय़ांची निर्मिती केली. हे झेंडे मातीत पुरल्यानंतर त्यातील बिया जमिनीत रुजतात व त्यातून रोपनिर्मिती होते,’ असे कृतिका यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांनी केवळ एक हजार झेंडय़ांची निर्मिती केली होती. मात्र समाजमाध्यमांवर या झेंडय़ांना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे १४ हजार झेंडय़ांची निर्मिती केली.
दुसरीकडे, महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या परडसिंगा या गावातील रहिवाशांनी पर्यावरणपूरक अशा राख्यांची निर्मिती केली आहे. या राख्यांच्या मध्यभागी किंवा दोऱ्याला झाडय़ांचा बिया बांधण्यात आल्या आहेत. यामध्ये तांदूळ, चंदन, राई, राजगिरा, तुळस या झाडांच्या बियांचा समावेश केला आहे. ग्राम आर्ट प्रकल्पाअंतर्गत चार वर्षांपासून या राख्यांची निर्मिती केली जात आहे. गावकऱ्यांनीच उत्पादित केलेल्या कापसाच्या धाग्यापासून राख्यांची निर्मिती करण्यात येत असून त्यांनी शेतात उगवलेली बियाणे यासाठी वापरण्यात येत आहेत, असे आर्ट प्रकल्पाच्या श्वेता यांनी सांगितले. कापसाच्या धाग्यांचे आकार करून त्याची राखी तयार केली जाते. त्यानंतर त्याच्या मध्यभागी किंवा दोऱ्याला बिया बांधल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा १२ हजार राख्या तयार करण्यात आल्या असून मुंबईसह, चेन्नई, बंगळूरु, हैदराबाद या शहरांमध्ये या राख्यांना मोठी मागणी असल्याचे श्वेता म्हणाल्या. या राख्यांची किंमत ३० ते ४० रुपये आहे.