मुंबई : भेडसावणारी पाण्याची चणचण, प्रतिकूल पर्यावरणीय स्थिती, सतत समाजाकडून होणारी उपेक्षा, जडणाऱ्या निरनिराळ्या व्याधी अशा अनेक कारणांमुळे गावखेड्यातील असंख्य महिला त्रस्त आहेत. महिलांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या ओळखून त्यावर तोडगा काढण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील किसळ-पारगावात पर्यावरण कारभारीण सज्ज झाली आहे. या पर्यावरण कारभारीणीने महिलांसाठी पोषण बाग, पावसाळ्यानंतर अवघ्या काही महिन्यातच कोरडीठाक पडणाऱ्या नदीचे संवर्धन, पर्यावरणपूर्वक उत्सव, निर्माल्यापासून खतनिर्मिती असे विविध पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून त्रस्त महिलांची पाठराखण केली आहे. एकूणच किसळ-पारगाव आणि आसपासच्या परिसरातील असंख्य महिलासांठी पर्यावरण कारभारीण आधार बनली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतकी वर्षे लोटली तरी गावखेडी अनेक सुविधांपासून वंचित आहेत. अनेक गावांमधील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पुरेशी वैद्यकीय सेवा, सकस आहाराचा अभाव असल्यामुळे महिलाच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. एकूणच गावखेड्यातील महिलांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. महिलांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या पर्यावरणाशी निगडीत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे या समस्या अधिकच ज्वलंत बनल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांना पर्यावरणविषयी योग्य ज्ञान असावे, प्रतिकूल परिस्थितीतही ठामपणे उभे राहता यावे या भावनेतून किसळ-पारगावाच्या सरपंच डॉ. कविता वरे यांनी पुढाकार घेऊन गावातील महिलांना एकत्र आणून पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. त्यातूनच ‘पर्यवरण कारभारीण’ जन्माला आली.

डॉ. कविता वरे मुळच्या भिमाशंकर येथील. पण त्यांची कर्मभूमी किसळ-पारगाव, ठाणे. ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश आहे. त्या गावांतील पर्यावरणासंबंधित प्रश्नांसाठी लढत आहेत. किसळ – पारगावमधील महिलांना संघटित करून त्या त्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत आहेत. महिला आणि पर्यावरणाचा संबंध मोठ्या प्रमाणात येतो, असे डॉ. कविता यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागते. यामुळे शारिरीकदृष्ट्या त्या थकतात. परिणामी, वयाच्या तीशीतच महिलांना गुडघेदुखी, कंबरदुखी यांसारखे त्रास उद््भवतात. याचे मूळ कारण महिलांची झालेली पायपीट. पूर्वी पंचक्रोषीत बारमाही नदी वाहत होती. परंतु आता ती कोरडीठाक पडली आहे. आजघडीला नदी कोरडीठाक का पडली याचा अभ्यास करण्यात आला. आता नदीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत. जलस्त्रोत, पावसाच्या पाण्याची साठवणूक आदींवरही पर्यावरण कारभारीण काम करीत आहे.

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पहिली महिला ग्रामसभा ३ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत उपस्थित असलेल्या महिलांना याबाबत माहिती देण्यात आली. यामुळे गावातील बहुसंख्य मंडळींनी गणपतीसाठी पर्यावरणपूरक सजावट करण्यास सुरुवात केली. तसेच उत्सवातील निर्माल्य पाण्यात न टाकता साठवून त्याचे खत करून प्रत्येक महिलेला आपापल्या शेतात वापरायला दिले. याचबरोबर गावातील काही महिला सतत आजारी पडत होत्या. काहींचे हिमोग्लोबिन कमी होते, तर काहींना जीवनसत्त्वचांची कमतरता होती. हिमोग्लोबिन आणि जीवनसत्वाच्या अभावामागे निरनिराळी कारणे असल्याचे लक्षात आले. मात्र, गावपातळीवर महिलांसाठी काही तरी करावे असा विचार करून डॉ . कविता यांनी महिलांसाठी ‘पोषण बाग’ आणि पपई लागवडीचा संकल्प सोडला. पपई महिलांसाठी चांगला नाही हा विचार कविता यांनी खोडून काढला. या उपक्रमात सुमारे ३०० महिला सहभागी झाल्या आणि त्यांनीही पपई लागवड केली. गाव म्हटले की चूल आलीच. चूलीतून होणाऱ्या धूरामुळे आरोग्याच्या तक्रारी उद््भवतात. महिलांचा हा त्रास कमी करण्यासाठी बायोगॅस चूल योजनेचा प्रस्ताव त्यांनी शासनाकडे सादर केला आहे. तसेच घरोघरी खतनिर्मितीचे विविध प्रस्तावही त्यांनी सादर केले आहेत.

गावातील पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल, याचबरोबर गेल्या अनेक वर्षात झालेला पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवता येईल यावर काम करणे अतिशय गरजेचे आहे. हे केले तरच आपली गावे पूर्वीसारखी निसर्गरम्य, समृद्ध होतील. यासाठी गावातील पर्यावरणाचे रक्षण करणे आणि ते अबाधित ठेवणे हाच एक पर्यावरण संवर्धनाचा उत्तम मार्ग आहे, असा कानमंत्र डॉ. कविता यांनी दिला.