लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (‘एमएमआरसीएल’) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील मेट्रो स्थानक परिसरात २,९३१ झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या वृक्ष लागवडीसाठी एकूण १२ कोटी १ लाख ६६ हजार १३६ रुपयांची तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. कंत्राटानुसार प्रत्येक झाडामागे ४१ हजार रुपये खर्च येणार आहे. दरम्यान, ‘मेट्रो -३’च्या मरोळ स्थानकाबाहेर केलेल्या वृक्षलागवडीतील काही झाडे उन्मळून पडली असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
‘मेट्रो -३’ मार्गिकेच्या कामासाठी ३३.५ किमीच्या परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करावी लागली होती. झाडांच्या कत्तलीवरून मोठा वादही झाला होता. हा वाद न्यायालयात गेला आहे. दरम्यान, ‘मेट्रो ३’च्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने आतापर्यंत ३,७७२ झाडे हटविण्यास परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात ३,०९३ झाडेच हटविल्याची माहिती एमएमआरसीएलकडून देण्यात आली. तर ६७९ झाडे वाचविण्यात एमएमआरसीएलला यश आल्याचेही स्पष्ट केले आहे. यानुसार एमएमआरसीएलच्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत आता ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील स्थानक परिसरात २९३१ झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा-मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या दुरुस्तीसाठी अन्य पर्याय
दरम्यान,उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ‘एमएमआरसीएल’ वृक्षारोपण करीत आहे, असे सातत्याने सांगण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत मरोळ स्थानकाबाहेर लावलेली काही झाडे उन्मळून पडली आहेत. मात्र याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. ‘झाडे लावून ती जगत नाहीत ही गंभीर बाब आहे. तोडण्यात आलेली झाडे कोणत्या प्रजातीची होती याची माहिती घेऊन त्याच प्रजातीची झाडे लावावी. यामुळे ती तग धरून राहतील. तसेच शहराचे पर्यावरण संतुलन चांगले राहील,’ असे मत पर्यावरणप्रेमी बी. एन. कुमार यांनी व्यक्त केले. दरम्यान, यासंदर्भात ‘एमएमआरसीएल’च्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
आणखी वाचा-गारगाई धरण प्रकल्प रखडणार
मेट्रो स्थानक परिसरातील वृक्षारोपणासाठी तीन कंत्राटदरांची नियुक्ती केली आहे. रोपवाटिकांमध्ये ४६ सेंमी परिघापर्यंत झाडांची वाढ करणे, या झाडांचे स्थानक परिसरात रोपण करणे आणि तीन वर्षे झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान एखादे झाड मृत झाल्यास त्याबदल्यात नवीन झाड लावणे बंधनकारक आहे. या २९३१ झाडांच्या रोपण मोहिमेसाठी तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. यासाठी १२ कोटी १ लाख ६६ हजार १३६ रुपयांची तीन कंत्राटे देण्यात आली आहेत. यानुसार एका झाडासाठी ४१ हजार रुपये खर्च येणार आल्याचेही एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.