मुंबई : ‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली आहे. मात्र मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असे ठाम मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे. त्यानुसार रविवारी (३ जूलै) सकाळी आरेत निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनाला विविध सामाजिक संस्थांसह सामान्यांचा प्रतिसाद मिळत असून मोठय़ा संख्येने ते आरेत जमा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासूत्रे हाती घेताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी ‘मेट्रो ३’साठीचे कारशेड आरेतच होईल असे जाहीर केले. या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडचा रेटा रेटू नका असे म्हटले. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी आरेत कारशेड करण्याची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे आता आरेवरून ‘कारे’ सुरू झाले असून येत्या काळात हा वाद अधिक चिघळणार आहे. या पार्श्वभूमीवर आता पर्यावरणप्रेमी, आरेवासीय आक्रमक झाले असून ‘आरे वाचवा’ (सेव्ह आरे) चळवळ तीव्र करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पर्यावरणप्रेमींकडून समाजमाध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. त्याला मुंबईकरांचाच नव्हे तर, देशभरातील पर्यावरणप्रेमी आणि सामान्य नागरिकांचा पािठबा मिळत आहे. आरे वाचविण्यासाठी सामान्य नागरिक हे रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे चित्र समाजमाध्यमातून दिसून येत असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी संजय वल्सन यांनी दिली.
आरेत कारशेड करण्याच्या नव्या सरकारच्या भूमिकेविरोधात रविवारी आरेमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय उस्फुर्तपणे पर्यावरणप्रेमी, पर्यावरणप्रेमी संघटना, सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष यांनी घेतला असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी तस्सलिम शेख यांनी दिली. रविवारी आरेतील ‘पिकनिक पॉईंट’ येथे सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी मोठय़ा संख्येने पर्यावरणप्रेमी मुंबईकर जमा होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेत पोलिसांनी आरेत बंदोबस्त वाढविला आहे.
सरकार आणि पोलिसांकडून रविवारचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला जुमणार नाही. आमची रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरूच राहील, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी शिंदे आणि फडणवीस यांना दिला.
‘जायका’ कंपंनीला पत्र..
मेट्रो ३ प्रकल्पाची उभारणी जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) च्या निधीच्या माध्यमातून केली जात आहे. ‘जायका’च्या धोरणानुसार प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची शाश्वती संबंधित यंत्रणांना द्यावी लागते. असे असताना ‘मेट्रो ३’ प्रकल्पात मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरेवर कशाप्रकारे घाव घातला जात आहे. याकडे ‘जायका’चे लक्ष वेधण्यासाठी ‘वॉचडॉग फाऊंडेशन’चे विश्वस्त ग्रॉडफ्रे पिमेंटा यांनी ‘जायका’ला पत्र पाठविले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यादृष्टीने ‘जायका’ने यात लक्ष घालावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
आरे वाचवण्यासाठी
शांततेत आंदोलन करणार आहोत. तसे आम्ही स्पष्ट केले आहे. असे असताना आरेत शनिवारी सकाळीच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यामुळे पर्यावरणप्रमींमध्ये नाराजी आहे.
– तस्सलिम शेख, पर्यावरणप्रेमी