मुंबई : ‘न्यू इंडिया को ऑप बँक’ गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सहा ऑडिट कंपन्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. बँकेच्या दोन शाखांमधील तिजोरीची क्षमता केवळ २० कोटी रुपयांची रक्कम ठेवण्याची असताना त्यात १३३ कोटींपेक्षा जास्त रक्कम ठेवल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे याप्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत.
या घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून रोज नवी माहिती उजेडात येत आहे. २०१९ ते २०२५ दरम्यान बँकेचे ऑडिट करणाऱ्यांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागली असून मेसर्स युजी देवी अँड कंपनी, मेसर्स गांधी अँड असोसिएट्स, मेसर्स शिंदे नायक अँड असोसिएट्स, मेसर्स जैन त्रिपाठी अँड असोसिएट्स आणि मेसर्स एसआय मोगुल अँड कंपनीच्या यांना चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय आणखी एका ऑडिट कंपनीशी संबंधीत व्यक्तीची चौकशी करण्यात असून कुठल्या आधारावर ऑडिट केले, या दिशेने तपास करण्यात येणार आहे.
बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमधील तिजोऱ्यांची क्षमता प्रत्येकी १० कोटींची रक्कम राहील एवढीच होती. असे असताना प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणी मिळून १३३ कोटी ४१ लाख रुपयांची रोकड असल्याचे दाखविण्यात आले. तपासात प्रभादेवी शाखेच्या तिजोरीत ११ कोटी १३ लाख आणि गोरेगाव शाखेच्या तिजोरीत ६० लाखांची रक्कमच सापडली. महाव्यवस्थापक हितेश मेहता याने १२२ कोटी रुपयांची रोकड केवळ कागदोपत्री दाखवून त्या रकमेचा अपहार केल्याचा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. तिजोरीच्या क्षमतेपेक्षा त्यात दाखवण्यात आलेली रक्कम सहा पट असल्याबाबत कोणालाच संशय कसा आला नाही, हा प्रश्न आर्थिक गुन्हे शाखेला पडला आहे. त्यामुळे ते याप्रकरणी बँकेशी संबंधीत व्यक्तींनाही लवकरच चौकशीला बोलाविले जाणार आहे.
आतापर्यंत तपासाची प्रगती
– प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
– बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला १२२ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली.
– मेहताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली.
– अपहाराच्या रक्कमेतील ७० कोटी रुपये मेहताने पौनला दिल्याचा संशय आहे.
– बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदर भोअन यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. – अरूण भाई नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू असून त्याला ४० कोटी रुपये मिळाल्याचे मेहताने सांगितले आहे.