विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी कामकाज सुरू होताच निधीवाटपाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या गोंधळामुळे सकाळी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले होते. परंतू त्यानंतर साडेबाराला कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने विधानसभेचे कामकाज आज सलग तीन वेळा तहकूब करण्यात आले.   
साडेबारा वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच उत्तराखंडमध्ये आपल्या प्राणाची बाजी लावून पर्यटकांचा जीव वाचवणा-या जवानांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, त्यावेळीसुध्दा गोंधळ सुरू झाल्याने कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
तत्पूर्वी, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांप्रमाणे विरोधकांनाही १०-१० कोटी रूपये द्यावेत अशी मागणी करत विरोधी पक्षांनी विधानसभेत गोधळ घातला. संतप्त आमदारांनी सरकारविरोधात घोषणा देत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत बसकण मांडली. या गदारोळामुळे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर सदस्यांना सभागृहाच्या बाहेर येऊनही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास विभागाच्या विविध योजनांचा निधी देताना सत्ताधारी आमदारांनाच भरीव स्वरूपात निधी दिला जातो आणि विरोधी आमदारांना डावलले जाते, असा आरोप करीत विरोधकांनी यापूर्वीही दोन दिवस विधानसभेचे कामकाज बंद पाडले होते. त्यावर वितरीत न झालेला निधी विरोधी सदस्यांना देण्याचे आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी हा वाद मिटविला होता. मात्र त्यानंतरही आपल्याला निधी मिळालेला नसल्याचा आरोप विरोधी आमदार करीत आहेत.
विविध योजनांच्या माध्यमातून निधीवाटप करताना डावलले जात असल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाकडे सपशेल काणाडोळा करीत आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी १० कोटींचा निवडणूक निधी देण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यामुळे निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज पुन्हा एकदा संघर्ष पेटल्याचे पहावयास मिळाले. शेवटी अध्यक्षांनी कामकाज तासाभरासाठी तहकूब केले.

Story img Loader