शैलजा तिवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना लसीकरणासाठी सक्तीचे केलेल्या को-विन अ‍ॅपमधील अनेक त्रुटी आणि वेळेवरील निर्बंध यामुळे लसीकरण मोहीम अद्यापही संथगतीनेच सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेची दिवसभरात ५० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची क्षमता असूनही सध्या दरदिवशी केवळ दहा हजार जणांचे लसीकरण पूर्ण होत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने लस उपलब्ध असूनही जोखीम असलेल्या, ६० वर्षांवरील, इतर आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण का केले जाते, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभाग राज्यांवर दबाव आणत आहे. मात्र त्याचवेळी को-विन अ‍ॅपच्या माध्यमातून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत आठवडय़ातील चारच दिवस लसीकरण करण्याचे बंधनही घातले आहे. त्यामुळे मनुष्यबळासह सर्व तयारी असूनही पालिकेची कोंडी झाली आहे.

तक्रारींचे निराकरण नाही

करोनाचे लसीकरण सुरू होऊन दीड महिना झाला तरी मुंबईत आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील सुमारे तीन लाख कर्मचाऱ्यांपैकी एक लाख ८० हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र पहिल्या दिवसापासून सुरू असलेल्या को-विन अ‍ॅपबाबतच्या तक्रारींचे निराकरण झालेले नाही. आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचेही लसीकरण सुरू केल्यानंतर लसीकरण केंद्रावर गर्दी वाढत आहे. परंतु लसीकरण मोहिमेचा वेग वाढलेला नाही

मुदत वाढविण्याची मागणी

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी दोन सत्रांमध्ये लसीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाने केली आहे. कामाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना लसीकरणाला येणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी, शनिवारीही लसीकरण करण्याची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. परंतु प्रतिसाद मिळालेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अ‍ॅपचा पर्याय गरजेचा

ज्येष्ठांचे लसीकरण सुरू केल्यानंतर सध्या असलेल्या अडचणी येत राहिल्यास रुग्णालयांना लसीकरण करणे अवघड होईल. त्यामुळे को-विन अ‍ॅपला पर्याय देणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

झाले काय? पालिकेने ५० केंद्रे लसीकरणासाठी सज्ज केली, परंतु को-विन अ‍ॅपमध्ये एका वेळेस इतक्या केंद्रांवर लसीकरण शक्य नसल्याचे कारण देत केंद्रांची संख्या कमी करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले. त्यामुळे पालिकेने सुरुवातीला १० ते १२ केंद्रे सुरू केली. को-विन अ‍ॅपमधील नोंदणी सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात येते. त्यात लसीकरण आठवडय़ातून चार दिवसच सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यातूनही मार्ग काढत पालिकेने शनिवारीदेखील लसीकरण सुरू केले, मात्र आता त्याचाही जाब पालिकेला विचारला जात आहे.

त्रुटी काय: नोंदणी केलेल्यांची नावे न दिसणे, फोन नंबर किंवा नावाच्या इंग्रजी अक्षरांमध्ये फेरफार झाल्यास शोधण्यास वेळ लागणे, पहिली मात्रा घेतलेल्यांची नावे उपलब्ध नसणे अशा अनेक अडचणी आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला अधिक वेळ लागतो. अ‍ॅपमधील त्रुटींमुळे गेले कित्येक दिवस दुसरी मात्रा देण्यातही अडचणी येत आहेत. तेव्हा पालिकेने नवीन अ‍ॅप तयार करून वापरण्याचा पर्यायही केंद्रीय आरोग्य विभागाला सुचविला, परंतु तो अमान्य करत या अ‍ॅपवरच नोंदणी करणे सक्तीचे केले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.