मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सरकते जिने, उद््वाहनाची (लिफ्ट) संख्या वाढविण्यात येत आहे. नव्या वर्षात सरकते जिने, उद््वाहनांच्या उभारणीच्या कामाला गती मिळणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर ही कामे हाती घेतली असून २०२७ पर्यंत मोठ्या संख्येने सरकते जिने, उद््वाहने प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईकराचा प्रवास घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सुरू असतो. प्रवासात वेळेची बचत होण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. यामुळे अनेक प्रवाशांचा अपघात होऊन जीव जातो किंवा गंभीर जखमी होतात. असे अपघात रोखण्यासाठी, प्रवाशांचा प्रवास आरामदायी होण्यासाठी एमआरव्हीसीचे प्रयत्न सुरू आहेत. सरकते जिने, उद््वाहन बसवून रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. एमआरव्हीसीने २०२४ सालापर्यंत मुंबईतील विविध उपनगरीय रेल्वे स्थानकांवर १५ उद््वाहने आणि १६ सरकते जिने यशस्वीरित्या स्थापित केले. तर, २०२४ सालामध्ये ४ नवीन उद््वाहने आणि ९ सरकते जिने उभारले. प्रवाशांना सुरक्षित आणि अधिक सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी २०२७ सालापर्यंत आणखी ११९ उद््वाहने आणि १८३ सरकते जिने बसवण्याची योजना आखली आहे. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरीय स्थानकांवर एकूण १३८ उद््वाहने आणि २०८ सरकते जिने उपलब्ध होतील.

हेही वाचा >>>पोलीस खात्यातील बहिण-भावाचा संपत्तीवरून वाद; एकमेकांविरुद्ध फिर्याद

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वृद्ध प्रवासी, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे कार्यालयीन वेळेत सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन आणि स्थानकांमध्ये सुरक्षित वातावरण आणि आरामदायी प्रवास होईल, असा विश्वास एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.

प्रवाशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी, स्थानकावर सोयी-सुविधा वाढवण्यात येत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, कार्यक्षम आणि आरामदायी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.- सुभाषचंद्र गुप्ता, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल्वे विकास महामंडळ

Story img Loader