लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: लुकआऊट सर्क्युलरच्या आधारे मुंबई विमानतळावर ताब्यात घैण्यात आलेल्या परदेशी नागरिकाने सुरक्षा यंत्रणांच्या हाती तुरी देऊन पलायन केले. आरोपीविरोधात महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) लुकआऊट सर्क्युलर काढले होते. आरोपी डॉमनिकन रिपब्लिकचा नागरिक असून त्याच्याविरोधात सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नूर मोहम्मद एडन (३६) असे आरोपीचे नाव आहे. एडन हा संतोष सावंत आणि सिद्दीकी नदीम हाफिज या दोन प्रवाशांसह ११ जुलै रोजी दुबईहून मुंबईत आला होता. तो इमिग्रेशन केंद्रावर गेला असता यंत्रणेत डीआरआयने त्याच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी केल्याचे दिसून आले. त्यानंतर इमिग्रेशन अधिकारी एडनला वरिष्ठ इमिग्रेशन अधिकाऱ्याकडे घेऊन गेले. एडनचे दोन साथीदार सावंत आणि हाफिजही एडनची विचारपूस करण्यासाठी तेथे पोहोचले. ते तिघे बोलत असतानाच शौचालयात जाण्याच्या बहाण्याने एडन विमानतळावरून पळून गेला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचा विमानतळावर शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही, असे तक्रारदार इमिग्रेशन अधिकाऱ्याने पोलिसांना सांगितले.
एडेन बराच वेळ परत न आल्याने हाफिजही तेथून निघून गेला. त्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्याने हाफिजशी संपर्क साधला आणि त्याला परत येण्यास सांगितले.हाफिज परत आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सावंत आणि हाफिजची एडनप्रकरणी चौकशी केली.
एडन, हाफिज आणि सावंत हे तिघे व्यवसायासाठी मुंबईत आले होते, असे हाफिजने सांगितले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सावंत आणि हाफिज यांना सहार पोलिस ठाण्यात नेले. तसेच एडनविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सावंत व हाफिज यांची माहिती घेऊन त्यांन जाण्याची परवानगी डीली. याप्रकरणी सहार पोलीस एडनचा शोध घेत असून याबाबतची माहिती डीआरआयला देण्यात आली आहे.