अंधेरीतील कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या नवजात बाळाच्या कुटुंबाला संपूर्ण नुकसान भरपाई देण्यास रुग्णालयाने नकार दिला आहे. आगीत एक आठवड्यापूर्वी जन्मलेल्या जुळ्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने मुलीचा नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्म झाला होता, तसंच तिची प्रकृतीही गंभीर होती त्यामुळे तिचा असाही मृत्यू होणार होता असं सांगत कुटुंबाला 10 लाखांची नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी मुलीचा मृत्यू झाला. रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन नवजात बाळांचा समावेश आहे. रुग्णालयाने अंधेरीत सोमवारी एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जखमी तसंच मृत्यू पडलेल्यांना नुकसान भरपाईचे चेक देण्यात आले. मृतांना 10 लाख तर जखमींना दोन लाखांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. मात्र विरारमधील दांपत्याला मुलीचा मृत्यू झाला असतानाही दोन लाखांचा चेक देण्यात आला. काही वेळाने अनिल आणि ललिता यांना जखमी झालेल्या दुसऱ्या मुलासाठीही त्याच रकमेचा चेक देण्यात आला. मुलगा सध्या होली स्पिरीट रुग्णालयात दाखल आहे.

ESIC Hospital fire in Mumbai: काही मिळालं नाही म्हणून पायपुसण्यानं झाकला मृतदेह

‘कोणतीही रक्कम आमच्या मुलीची नुकसान भरपाई करु शकत नाही, पण तिचा आगीमुळे मृत्यू झाला हे ते कसं काय फेटाळून लावू शकतात’, असा सवाल ललिता यांनी विचारला आहे. रुग्णालयाने लावलेल्या मृत आणि जखमींच्या यादीत त्यांच्या मुलीचं नाव जखमींमध्ये असल्याचं अनिल यांनी सांगितलं आहे.

‘आम्ही रुग्णालयाला त्यांची चूक लक्षात आणून दिली, मात्र त्यांना तिचा मृत्यू झाल्याचं आधीपासूनच माहिती असल्याचं आम्हाला कळलं’, असं अनिल यांनी सांगितलं आहे. अनिल एसी टेक्निशिअन आहे. ‘अधिकाऱ्यांनी आम्ही चेक घ्यावा यासाठी आग्रह केला. जी काही रक्कम मिळत आहे ती घ्या आणि हा प्रकार रुग्णालयाच्या वरिष्ठांपर्यंत घेऊन जा असं अधिकाऱ्यांनी सांगितलं’, अशी माहिती अनिल यांनी दिली आहे. जर आम्ही हा चेकही परत केला तर कदाचित मोकळ्या हातानेच परतावं लागेल या भीतीने आम्ही चेक स्विकारला असल्याचं अनिल यांनी सांगितलं आहे.

आपण बाळाचा साधा फोटो काढू शकलो नाही की तिचं बारसं घालू शकलो अशी खंत ललिता यांनी व्यक्त केली आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाचा तपास केला जाईल असं आश्वासन दिलं आहे.

Story img Loader