एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेताना कार्यक्षेत्राच्या मुद्दय़ावरून तक्रारदाराची परवड करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने मंगळवारी चांगलेच फैलावर घेतले.
कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करून इस्थर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि जबाबदारी झटकणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे आदेश देण्याच्या मागणीसाठी अॅड्. आभा सिंह यांनी याचिका केली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.
विजयवाडा येथे जाऊन तिच्या वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर आणि प्रकरण मुंबई पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतल्याचे सिंह यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल घेत आधीच बेजार झालेल्या नातेवाईकाची फरफट करण्याऐवजी तक्रार दाखल करून घेण्यास न्यायालयाने सांगितले. बेपत्ता झाल्याप्रकरणी लेखी तक्रार नोंदवून घेणे बंधनकारक असल्याची माहिती सरकारी वकील संदीप शिंदे यांनी दिली.
…अनेक प्रश्न अनुत्तरीतच
इस्थर अनुह्य हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड झाला असला तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ती फलाट क्रमांक ५ वर का गेली, आरोपी सानप याच्या मोटारसायकलवर का बसली, तिच्यावर बलात्कार झाला होता का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहेत.
५ जानेवारी रोजी इस्थर अनुया लोकमान्य टिळक टर्मिनसच्या फलाट क्रमांक ३ वर उतरली होती. प्रतिक्षालय शोधत ती फलाट क्रमांक ४ वर गेली. पण ते खराब असल्याने ती परतली. पण नंतर फलाट क्रमांक ५ वर जाऊन बसली. या ठिकाणी ती का गेली हा प्रश्न अजून पोलिसांना भेडसावत आहे. टॅक्सी नसलेल्या सानप याने मोटरसायकलने सोडण्याची हमी दिल्यावर ती त्याच्याबरोबर जाण्यास तयार कशी झाली, याचेही नेमके उत्तर सापडलेले नाही.
स्थानकाबाहेरच्या प्रत्येक टॅक्सी आणि रिक्षाचालकाची पोलिसांनी चौकशी केली होती. पण एकानेही या दोघांना पाहिल्याचे सांगितले नाही. एका अनोळखी इसमाच्या मोटारसायकलीवर तरूण मुलगी बसणार नाही. पण ती बसली हेच सत्य आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांनी सांगितले. इस्थरच्या मोबाईलचा टॉक टाइम संपला होता. त्यामुळे तिने प्रवासात लॅपटॉपवरून तीन वेळा रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला होता. पण रिचार्ज होऊ शकला नाही, अशी माहितीही समोर आली आहे. सुरुवातीला चोरीचा उद्देश असलेल्या सानपची रस्त्यात नियत बदलली. घटनास्थळी बलात्काराचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, अशी कबुली सानपने दिली. बलात्कार झाला तरी मृतदेह कुजल्यामुळे ते न्यायवैद्यक चाचणीत सिद्ध होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
..सानप घटनेवर लक्ष ठेवून होता
इस्थरची हत्या केल्यानंतर सानप पुन्हा तिचा मोबाईल घेण्यासाठी घटनास्थळावर आला होता. यानंतर नाशिकला गेलेला सानप तेथील वर्तमानपत्रे वाचून टीव्हीच्या बातम्या पाहून या घटनेवर लक्ष ठेवून होता. दरम्यान तो एकदा मुंबईला येऊन गेला. जेव्हा त्याने स्वत:चे छायाचित्र टिव्हीवर संशयित म्हणून पाहिले तेव्हा तो अधिक सावध झाला होता. या घटनेनंतर त्याने आपला मोबाईल क्रमांकही बदललेला होता.