मुंबई : युरेशियामध्ये आढळणाऱ्या ‘युरेशियन ससाण्या’चे (युरेशियन गोशॉक) ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्यात दर्शन घडले. दरम्यान, अभयारण्यातील ही पहिलीच नोंद असून गस्तीवर असलेल्या वनपालांना युरेशियन ससाण्याचे दर्शन घडले.

युरेशियन ससाणा ही ॲसिपिट्रिडे कुटुंबातील मध्यम – मोठ्या शिकारी पक्ष्यांची एक प्रजाती आहे. त्यामध्ये गरुड , बझार्ड आणि हॅरियर्ससारख्या इतर शिकारी पक्ष्यांचा समाविष्ट आहे. ही एक व्यापक प्रजाती असून युरेशियातील समशीतोष्ण भागांमध्ये आढळते. युरेशियन ससाणा हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करतात. युरेशियन ससाणा प्रामुख्याने युरेशियामध्ये आढळतो. याचबरोबर आयर्लंड आणि आइसलँड वगळता ते युरोपच्या बहुतेक भागात दृष्टीस पडतात. हिवाळ्यात ते क्वचितच दक्षिणेस सौदी अरेबियातील तैफ आणि कदाचित टोंकिन, व्हिएतनाममध्ये आढळतात. हा पक्षी तुलनेने लहान असतो. त्याचे पंख रुंद आणि शेपटी लांब असते. बऱ्यापैकी पाय लहान आणि विशेषतः बोटे जाड असतात. शरीराच्या वरील भागावर निळे – राखाडी किंवा तपकिरी – राखाडी रंगाचे ठिपके असतात. त्यावर गडद पट्टी असते किंवा खाली राखाडी किंवा पांढरा रंग असतो. परंतु विशेषतः आशियाई उपप्रजाती या जवळजवळ पांढऱ्या ते काळ्या रंगाच्या असतात. जसजसे या पक्ष्याचे वय वाढते तसतसे त्यांच्या पाठीचा भाग फिकट निळ्या रंगाचा होतो.

युरेशियन ससाणा हा शिकारी पक्षी आहे. हा पक्षी जंगल, शेतजमीन, पाणथळ जमीन, गवताळ प्रदेशांमध्ये आढळतो. हे पक्षी एकच घरटे अनेक वर्षे वापरतात. घरटे बांधताना बहुतांशी जोडी एकत्र राहते. नर नवीन घरटे बांधतात. मादी एप्रिल ते जून (सहसा मे) दरम्यान सरासरी २ ते ३ दिवसांच्या अंतराने अंडी घालते. अंडी उबल्यानंतर नर थेट घरट्यात येत नाही, तर त्याऐवजी घरट्याजवळील एका फांदीवर फक्त अन्न पोहोचवतो. मादी स्वतः ते खाते आणि पिल्लांनाही देते.

दरम्यान, तानसा अभयारण्यात २१२ प्रकारचे पक्षी आढळतात. बिबटा, पिसूरी हरिण, सांबर, बिबट्यासारखी दिसणारी मांजर, ठिपक्यांची मांजर, भारतीय साळिंदर, लालसर रंगाचे मुंगुस, लहान आकाराचा भारतीय कांडेचोर, पट्टेदार तरस, भारतीय खवल्या मांजर आदी सस्तन प्राण्यांचे ५० हून अधिक प्रकार या अभयारण्यात आहेत. चार शिंगांचे काळवीट या परिसरात आढळते. याचबरोबर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी’ने (बीएनएचएस) भारतीय घुबडासह विशिष्ट पक्षी, किडे, सस्तन प्राणी असल्याची नोंदही केली आहे.

पिल्ले ५० दिवसांची झाल्यानंतर शिकार करतात

युरेशियन ससाणाची पिल्ले ५० दिवसांची झाल्यानंतर स्वतःहून शिकार करायला सुरुवात करतात. अंडी उबवल्यानंतर ६५ ते ९० दिवसांदरम्यान कमी-अधिक प्रमाणात सर्व लहान पक्षी स्वतंत्र होतात.

Story img Loader