मुंबई : मागील दोन वर्षांपासून प्रशासक असलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली. जाहीर केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज घेण्यासाठी परिषदेच्या कार्यालयात जाणाऱ्या डॉक्टरांना हात हलवतच माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छुक डॉक्टर मंडळी या सावळ्या गाेंधळाबाबत संताप व्यक्त करीत आहेत.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा कारभार मागील दोन वर्षांपासून प्रशासकांमार्फत चालविण्यात येत होता. नियमानुसार परिषदेच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. परिषदेने १७ जानेवारी रोजी निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार अर्ज घेण्यासाठी परिषदेच्या चिंचपोकळी येथील कार्यालयात गेल्यानंतर त्यांना अर्ज उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांना अर्ज कधी मिळणार याची माहितीही दिली जात नाही. परिषदेसाठी निबंधक नसल्याने कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. त्यामुळे एकूणच संभ्रमाचे वातावरण आहे.

निवडणूक जाहीर होऊन १४ दिवस उलटले तरी अर्ज देण्यात आलेले नाहीत. अर्ज भरण्यास कमी कालावधी मिळणार असल्याने उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावपळ होण्याची शक्यता आहे. काही उमेदवारांनी याबाबत थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर त्यांना मतदारांची यादी पूर्ण झाल्यानंतरच अर्ज मिळतील असे सांगण्यात आले. त्यामुळे मतदारयादी तयार करण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती उमेदवारांना न देता प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण असून, निवडणूक प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ असल्याची टीका हिलिंग हँड युनिटी पॅनेलचे समन्वयक डॉ. तुषार जगताप यांनी केली आहे.

७० हजार डॉक्टरांना निवडणूक प्रक्रियेतून वगळले

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त डॉक्टर नोंदणीकृत आहेत. मात्र यापैकी जवळपास ७० हजार डॉक्टरांनी त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण न केल्याने त्यांना मतदान प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. नोंदणी नूतनीकरण न केल्याने त्यांना निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असा निर्णय परिषदेने घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निबंधकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारपासून ते कर्तव्यावर रूजू होतील. नवीन मतदार यादीनुसार उमेदवारांना अर्ज दिले जाणार आहेत. जेणेकरून त्यांचा अर्ज बाद होणार नाही. अंतिम मतदार यादी जाहीर केल्यानंतर ६ फेब्रुवारीपासून उमेदवारांना अर्ज मिळण्यास सुरुवात होईल. तसेच निवडणुकीदरम्यान उमेदवारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काही व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे. – शिल्पा परब, निवडणूक अधिकारी

Story img Loader