मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या बढती प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतरही प्रशासनाने त्यांच्यावर विभागांची जबाबदारीच सोपविलेली नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अधिकारी आपल्या जुन्याच पदावर काम करीत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाटय़ावर आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आणि दादर, माहीमचा समावेश असलेल्या ‘जी उत्तर’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना बढती देण्याबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मंजूर झाला आहे. असे असले तरी हे दोन्ही अधिकारी जुन्याच पदावर कार्यरत आहेत.
या दोन्ही अधिकाऱ्यांना बढती देण्याबाबतचे आदेश काढले नाहीत. त्यांना कोणत्याही विभागाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. हे दोन्ही अधिकारी साहाय्यक आयुक्त पदावरच काम करीत आहेत. तसेच त्यांना साहाय्यक आयुक्त पदाचेच वेतन मिळत आहे. मात्र प्रस्ताव मंजूर होऊनही बढतीचे आदेश न मिळाल्यामुळे या दोघांबाबत अन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, या दोन्ही अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. बढतीला मंजुरी दिलेली असली तरी प्रशासनाने आदेशच काढलेले नाहीत, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गायकवाड यांना गेल्या आठवडय़ात त्यांच्या सध्याच्या पदाबरोबरच वित्त विभागाच्या उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे व तो आपण स्वीकारला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या दोन अधिकाऱ्यांना अद्याप बढतीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यापाठोपाठ बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अन्य अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मिलीन सावंत म्हणाले की, या दोन्ही अधिकाऱ्यांना बढती देण्यास मंजुरी दिलेली आहे. मात्र आदेश काढलेले नाहीत. उपायुक्त पदासाठी गरज निर्माण होईल तेव्हा ते आदेश काढले जातील. सध्या उपायुक्त पदाच्या दोन जागा रिक्त असून त्याचा अतिरिक्त कार्यभार आधीच दिलेला आहे.