सचिन धानजी

आयुक्तांच्या आदेशांचा विसर अपघातांना कारणीभूत

रस्त्यांवरील अपघातांना कारणीभूत ठरणारे पेव्हर ब्लॉक त्वरित काढून त्या ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या आयुक्तांनी दीड वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाला हरताळ फासला गेल्याने मुंबईत ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक ‘जैसे थे’च आहेत. पेव्हर ब्लॉक काढण्यात झालेली ही दिरंगाईच दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील अपघाताला कारणीभूत ठरली आहे.

महापालिकेने दीड वर्षांपूर्वी रस्त्यांच्या केलेल्या पाहणीत रस्त्यांची सर्वाधिक दुरवस्था पेव्हर ब्लॉकमुळे झाल्याचे दिसून आले होते. या पाहणीत एकूण ४५५ ठिकाणी रस्ते खराब झाल्याचे दिसून आले होते. त्यातील २३५ ठिकाणच्या रस्त्यांची ‘पेव्हरब्लॉक’मुळे दुरवस्था झाली होती. अपघाताला कारणीभूत ठरलेले हे पेव्हर ब्लॉक त्वरित काढून त्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आदेश जानेवारी, २०१७ रोजी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार काही रस्त्यांवरील ‘पेव्हरब्लॉक’ काढून टाकण्यात आले. परंतु आजही अनेक रस्त्यांवर ‘पेव्हरब्लॉक’ दिसून येत आहेत.

दादर पूर्व येथील आंबेडकर मार्गावर चित्रा सिनेमागृहासमोर गुरुवारी दुचाकीस्वारांच्या झालेल्या अपघातात उखडलेले पेव्हर ब्लॉकच कारणीभूत ठरले आहे. या शिवाय जवळच जलवाहिनीचे काम सुरू होते. या ठिकाणच्या खड्डय़ात तोल जाऊन अनेक अपघात होत आहेत.

इथेच नव्हे दादर पूर्व भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पुलाखालील भागात मोठय़ा प्रमाणात ‘पेव्हरब्लॉक’ बसवण्यात आले आहेत. हे सर्व ‘पेव्हरब्लॉक’ झिजून गेले आहेत. त्यामुळे रस्ते असमतल झाले आहेत. मात्र, आयुक्तांनी आदेश देऊनही या रस्त्यांवरील ‘पेव्हरब्लॉक’ का बदलले गेले नाहीत, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाकरिता स्वतंत्र कंत्राटदाराची निवड दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. परंतु कंत्राट देऊनही या कंत्राटदारामार्फत रस्त्यांचा विकास केला गेलेला नाही. अत्यंत धिम्या गतीने या मार्गाचे काम सुरू आहे,’ असा आरोप शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी केला.

६० टक्के काम पूर्ण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाच्या विकासकामांसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे ‘पेव्हरब्लॉक’ हटवून रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावरील भेगा बुजविणे व पदपथ अशा कामांचा समावेश आहे. शीव ते जे.जे.रुग्णालयापर्यंत पसरलेल्या या रस्त्यांच्या बांधकामासाठी वाहतूक पोलिसांकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने ही काम आतापर्यंतपर्यंत पूर्ण होऊ  शकलेली नाही. तरीही ६० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा रस्ते प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी केला आहे. आतापर्यंत जे. जे. रुग्णालय ते काळाचौकीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. लालबाग, दादर परिसरातील रस्त्याच्या कामाला अद्याप वाहतूक पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. ही परवानगी मिळताच ‘पेव्हरब्लॉक’ काढून डांबरीकरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.