लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई वा मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना म्हाडा हाच एकमेव पर्याय आहे. सर्वसामान्यांबरोबरच चित्रपट – मालिका क्षेत्रातील कलाकारही म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. यंदाही कोकण मंडळाच्या सोडतीतील कलाकारांनी घरांसाठी अर्ज सादर केले आहेत. त्यात विवेक सांगळे, पृथ्विक प्रताप, योगिता चव्हाण आदींचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या कलाकारांनी २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांसाठी अर्ज केले आहेत.

म्हाडाच्या सोडतीत कलाकारांसाठी नियमानुसार काही घरे राखीव असतात. त्यामुळे या प्रवर्गातून कलाकार मोठ्या संख्येने मुंबई आणि ठाण्यातील घरांसाठी अर्ज करतात. आतापर्यंत म्हाडाने अनेक कलाकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. येत्या १० मे रोजी काढण्यात येणाऱ्या कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांच्या सोडतीतही कलाकारांनी अर्ज भरले आहेत. गुरूवारी प्रसिद्ध झालेल्या स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीनुसार कलाकार प्रवर्गात ‘हास्यजत्रा’फेम पृथ्विक प्रताप, ‘भाग्य दिले तू मला’मधील राजवर्धन मोहिते अर्थात विवेक सांगळे आणि ‘जीव माझा गुंतला’मधील अंतरा अर्थात योगिता चव्हाण यांनी कोकण मंडळाच्या घरांसाठी अर्ज भरले आहेत.

आणखी वाचा- मुंबई :‘बेस्ट’मध्ये मोबाइलचा मोठा आवाज बंद !स्पीकरवर गप्पा, गाणी ऐकल्यास पोलिसांत तक्रार

पहिल्यांदाच अर्ज भरला आहे

मी कोल्हापूरची आहे. सध्या कामानिमित्त मुंबईतील मालाडमध्ये भाड्याच्या घरात राहत आहे. मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे अशी इच्छा आहे. परवडणाऱ्या दरात म्हाडाच्या माध्यमातूनच घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यामुळे मी ठाणे आणि घणसोलीतील घरासाठी अर्ज भरला आहे. पहिल्यांदाच म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला आहे. आता बघू माझे स्वप्न पूर्ण होते का? -योगिता चव्हाण, कलाकार, ‘जीव माझा गुंतला’ (अंतरा)

मी सध्या विक्रोळीत भाड्याच्या घरात राहतो. अनेक कलाकारांचे हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले आहे. मीही मागील काही वर्षांपासून म्हाडाच्या घरासाठी अर्ज करीत आहे. ही माझी पाचवी वेळ आहे. आता मी ठाण्यातील घरांसाठी अर्ज केला आहे. एक – दोन नव्हे तर पाच अर्ज भरले आहेत. यावेळी तरी घर लागावे हीच अपेक्षा आहे. या सोडतीत घर लागले नाही, तर मी मुंबईतील घरांसाठी नक्कीच अर्ज करणार आहे. -पृथ्विक प्रताप, कलाकार, ‘हास्यजत्रा’

संधी हुकली

कोकण मंडळाच्या सोडतीतील घरासाठी अर्ज भरला होता. मात्र निवासाचा दाखला वेळेत प्राप्त न झाल्याने आपली यावेळची संधी हुकली, अशी खंत ‘हास्यजत्रा’मधील आघाडीचा कलाकार दत्तू मोरेने व्यक्त केली. आता मुंबईतील घरासाठी अर्ज करणार आहे. त्यासाठी सर्व कागदपत्र जमा करीत असल्याचेही त्याने सांगितले.

Story img Loader