लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून प्रवासी भाडे नाकारण्याचे प्रकार सुरूच आहेत. यावर ठोस कारवाई न झाल्याने, याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. पावसाळ्यात लोकल सेवा उशिराने धावत असल्याने आणि स्वतःचे वाहन वापरण्याऐवजी अनेक प्रवासी टॅक्सी किंवा रिक्षाचा पर्याय निवडतात. रिक्षा-टॅक्सी चालक मात्र भाडे नाकारत असल्यामुळे अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळू लागताच मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचा वेग मंदावतो. त्यामुळे अनेक प्रवासी रस्ते मार्गाने इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय निवडतात. बेस्टची बस वेळेत उपलब्ध होत नसल्याने प्रवासी रिक्षा किंवा टॅक्सीचा पर्याय निवडतात. मात्र, रिक्षा, टॅक्सी चालक प्रवाशांबरोबर जवळचे भाडे नाकारत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात रिक्षा-टॅक्सी चालक भाडे नाकारत असल्याने प्रवाशांच्या समस्यांमध्ये भर पडते. पूर्वी रिक्षा-टॅक्सी जवळच्या ठिकाणी जाण्यास नकार द्यायचे. मात्र, आता अनेक चालक दूरवर जाण्यासही नकार देवू लागले आहेत.

आणखी वाचा-मुंबई : वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला कर्नाटक पोलिसांकडून अटक

अनेक चालक प्रवाशांना हेरून, त्यांची फसवणूक करून आर्थिक लूट करण्याच्या हेतूने भाडे स्वीकारतात. त्यामुळे अशा चालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. प्रवाशांबरोबर गैरवर्तन करणाऱ्या, भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर मुंबईतील वाहतूक पोलिसांनी, परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारणे अपेक्षित आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी परिवहन विभागाचा व्हॉट्स ॲप क्रमांक रेल्वे स्थानके, बस थांबा, रिक्षा-टॅक्सी थांबे व इतर गर्दीच्या ठिकाणी लावणे आवश्यक आहे, असे वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त ग्रॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.

तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक

ताडदेव आरटीओ – ९०७६२०१०१०
अंधेरी आरटीओ – ९९२०२४०२०२
बोरिवली आरटीओ – ८५९१९४४७४७
वडाळा आरटीओ – ९१५२२४०३०३