लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पावसाळ्याच्या आधी दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण करत मे महिन्याच्या मध्यावर अतिधोकादायक इमारतींची यादी जाहिर करणे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाला क्रमप्राप्त असते. त्यानुसार दरवर्षी मे महिन्याच्या मध्यमावर ही यादी जाहिर केली जाते. पण यंदा मे महिना संपत आला, पावसाळा तोंडावर आला तरी ही यादी अद्याप मंडळाने जाहीर केलेली नाही.
दक्षिण मुंबईतील अंदाजे १४ हजार उपकरप्राप्त इमारतींच्या देखभाल-दुरूस्तीची संपूर्ण जबाबदारी दुरुस्ती मंडळाकडे आहे. या सर्वच इमारती धोकादायक असून त्यांचा पुनर्विकास करणे गरजेचे आहे. मात्र या इमारतींच्या पुनर्विकासाचे स्वतंत्र ठोस धोरण नसल्याने १४ हजार इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. वर्षभरापूर्वी पुनर्विकासाचे नवीन धोरण लागू झाले असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पण आजच्या घडीला १४ हजार इमारती धोकादायक आहेत. अशात पावसाळ्यात उपकरप्राप्त इमारती कोसळण्याच्या, त्यात जिवितहानी होण्याच्या घटना घडतात. तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी, त्यातही जिवितहानी रोखण्यासाठी दरवर्षी पावसाळ्याआधी दुरूस्ती मंडळाकडून इमारतींचे सर्वेक्षण केले जाते.
मार्च-एप्रिलमध्ये सर्वेक्षणास सुरुवात करून १५ मे पर्यंत यादी जाहिर करणे अपेक्षित असते. त्यानंतर यादीतील इमारतींना, त्यातील रहिवाशांना नोटीसा देत पावसाळ्यापूर्वी अर्थात जूनच्या पहिल्या आठवड्यात स्थलांतरीत करणे गरजेचे असते. त्यानुसार दुरूस्ती मंडळाने यंदा वेळेत सर्वेक्षण सुरु केले. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहितीही मिळते आहे. पण अतिधोकादायक इमारतींची यादी काही जाहिर केलेली नाही. अशावेळी या सर्व प्रक्रियेला विलंब झाला आणि कोणतीही दुर्घटना घडली तर याला कोण जबाबदार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान ही यादी केव्हा जाहिर होणार, यादी जाहिर करण्यास विलंब का होत आहे याबाबत दुरूस्ती मंडळाच्या उच्च पदस्थ अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
© The Indian Express (P) Ltd