मुंबई: पूर्व उपनगरातील शीव येथील गांधी मार्केट परिसरात पाणी साचले होते. या परिसरात पालिकेने लघु उदंचन केंद्र उभारले आहे. गेल्यावर्षी या भागात पाणी साचले नव्हते. त्यामुळे पालिकेने या लघु उदंचन केंद्राचे कौतुक केले होते. मात्र रविवारी मध्यरात्री पडलेल्या पावसाने गांधी मार्केटमध्येही पाणी साचले होते. सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत या पाण्याचा निचरा झाला नव्हता.
शीव येथील गांधी मार्केट परिसर हा मुंबईतील आणखी एक सखल भाग आहे. खोलगट बशीसारखा भाग असल्यामुळे या परिसरात गेली अनेक वर्षे तीन ते चार फूट पाणी भरत असे. तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास ८ ते १० तास लागत असत. त्यामुळे या परिसरात अनेक बैठ्या घरात पाणी जात असे. तसेच या परिसरातील दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरल्यामुळे व्यावसायिकांचेही नुकसान होत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूकही विस्कळीत होत होती. गांधी मार्केट हा भाग पूर्व द्रूतगती महामार्गावर असल्यामुळे पूर्व उपनगराचा संपर्क तुटत होता. त्यामुळे पालिकेने ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत माहूल येथे उदंचन केंद्र उभारण्याचे ठरवले होते.
हेही वाचा >>>‘रिंगण सोहळा पाहिला म्या डोळा’; तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अश्वांचे रिंगण
परंतु, जागेअभावी हे केंद्र अद्याप सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी पालिकेने तेथे लघु उदंचन केंद्र सुरू केले. १२०० मिमी ची व्यासाची पोलादी वाहिनी टाकून रस्त्यावरील सर्व पाणी चेंबरमध्ये येण्यासाठी डॉ. आंबेडकर मार्गावर पर्जन्यजलवाहिनी टाकण्यात आली. तेथे प्रतितास ३००० घनमीटर पाण्याचा निचरा होईल असे चार उदंचन संच बसवण्यात आले. तसेच प्रतितास १००० घनमीटर पाण्याचा उपसा करणारे ३ उदंचन संच बसवण्यात आले. त्यामुळे या परिसरातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊ लागला. परंतु, यावेळी गांधी मार्केट परिसरातही पाणी साचले.
हेही वाचा >>>अखेर ठरलं! पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलबाबत मोहोळांची मोठी घोषणा
दरम्यान, सोमवारी संपूर्ण दिवसभरात हिंदमाता, गांधी मार्केट, नेहरु नगर, कुर्ला, अंधेरी सबवे, सांताक्रूझ एअर इंडिया वसाहत, ईर्ला जंक्शन, मालवणी मालाड, वडाळा सक्कर पंचायत परिसर, रफी अहमद किडवाई मार्ग या भागात पाणी साचले होते. मात्र गांधी मार्केट, कुर्ला आणि चुनभट्टी येथील पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
संपूर्ण मुंबईत पालिकेने पाण्याचा उपसा करण्यासाठी ४८१ पंप बसवले आहेत. काही रेल्वे स्थानकांमध्ये पालिकेने आणि रेल्वेने पंप बसवले आहेत. तसेच संपूर्ण मुंबईसाठी पाणी उपसा करणारे आणखी काही पंप तैनात ठेवण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे कोणकोणत्या भागात पाणी साचले, का पाण्याचा निचरा होऊ शकला नाही याचा आम्ही अभ्यास करू, असेही ते म्हणाले.