‘गोविंदा रे गोपाळा..’ करत मुंबईच्या गल्लीगल्लीतून साजरा होणारा दहीहंडीचा उत्सव पूर्णपणे ‘कॉपरेरेट’ बनला आहे. आलिशान आयोजन, डीजेंचा दणदणाट आणि सेलिब्रिटींची उपस्थिती यांनी रंगणाऱ्या लाखमोलाच्या हंडय़ा यंदा आणखी वाढल्या असून या सर्व उत्सवातील आर्थिक उलाढाल १०० कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे.
बडय़ा कंपन्या, राजकीय नेत्यांकडून बक्कळ देणग्या मिळवून आयोजक-प्रायोजक मंडळी दहीकाल्याच्या उत्सवाचे आर्थिक गणित जुळवू लागले आहेत. दहीहंडी उत्सवाची वाढती लोकप्रियता आणि आगामी निवडणुका या दोन्हींवर लक्ष ठेवून यंदा अनेक ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे देणाऱ्या दहीहंडय़ा लटकणार आहेत. यंदा ठाण्यामध्ये दोन आयोजकांनी सर्वात उंच म्हणजे १० थर रचून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. ठाणेकरांना प्रत्युत्तर देण्यासाठी घाटकोपरमध्ये ५१ लाखांची दहीहंडी बांधण्यात आली आहे. मुंबईतील इतर आयोजकांनी बरीच मजल मारत लाखमोलाच्या दहीहंडय़ा बांधल्या आहेत. त्याशिवाय सात, आठ आणि नऊ थर रचणाऱ्या गोविंदांना बक्षिसापोटी देण्यात येणाऱ्या रकमांची मोजदाद करणे अवघडच आहे. दहीकाला उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रेक्षकांनाही पारितोषिकांचे आमिष दाखविण्यात आले आहे. गोविंदांना भिजविण्यासाठी लागणारे पाणी, भव्य व्यासपीठ, अभिनेते-अभिनेत्री, कार्यकर्त्यांचा फौजफाटा आदींसाठी कोटय़वधी रुपये खर्ची पडले आहेत. गल्लीबोळांतील छोटेखानी दहीहंडी उत्सवासाठीही लाखो रुपये खर्ची पडत आहेत. आयोजक हा सर्व खर्च बडय़ा कंपन्या, राजकीय नेत्यांच्या मदतीने करीत असतात. मात्र गल्लीबोळांतील उत्सवांसाठी सर्वसामान्यांच्या खिशाला खार लावून वर्गणी गोळा केली जाते आणि त्यातच उत्सव साजरा होतो.

तळ भक्कम करण्यासाठी माथाडींची मदत
पाच, सहा आणि सात थराच्या दहीहंडय़ा फोडून फारसे बक्षीस पदरात पडत नसल्यामुळे आता मुंबईमधील बहुसंख्य गोविंदा पथके आठ-नऊ थराच्या दहीहंडय़ांना गवसणी घालण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यासाठी पथकांना तरुणांची गरज भासू लागली आहे. तरुणांनी आपल्या पथकात यावे यासाठी अनेकांनी खटपटी सुरू केल्या आहेत. तळातला थर भक्कम असावा यासाठी काही पथके माथाडी कामगारांचीही मदत घेत आहेत.