पालिकेच्या नव्या नियमाचा फायदा
मुंबई गृहनिर्माण मंडळाची धरसोड वृत्ती आणि गृहनिर्माण खात्याचा कार्यभार पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे म्हाडा इमारतींचा पुनर्विकास रखडलेला असला तरी महापालिकेच्या चटई क्षेत्रफळविषयक नव्या नियमामुळे प्रत्येक रहिवाशाला किमान ५८० चौरस फुटांचे घर देणे बंधनकारक ठरणार आहे.
मुंबईतील ५६ म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास गेले तीन-वर्षांपासून रखडला आहे. नवे गृहनिर्माण धोरण आणि त्याबाबत एकदा अधिसूचना जारी झाल्यानंतरही म्हाडाने आपल्या परीने ठराव करून फक्त घोळ घालण्याचे काम केले आहे. यामुळे म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास रखडला आणि त्यातच मध्यंतरी पालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी मोफत चटई क्षेत्रफळाची संकल्पना बंद करून ‘फंजिबल एफएसआय’ पद्धत सुरू केली. त्यामुळे यापुढे फ्लॉवर बेड, लिफ्ट-स्टेअरकेस तसेच बाल्कनीच्या एरियासाठी प्रीमिअम भरून चटई क्षेत्रफळ लागू केले आहे. हे बंधनकारक असल्यामुळे प्रत्येक विकासकाला ते घ्यावे लागणार आहे. परिणामी म्हाडा वसाहतीतील अल्प उत्पन्न गटाला ४८४ चौरस फुटांची मर्यादा घालताना पूर्वी त्याच्या दहा टक्के एरिया अधिक मिळत होता. मात्र हा एरिया अधिकृतपणे चटई क्षेत्रफळात हस्तांतरित होत नव्हता. आता मात्र फंजिबल एफएसआयच्या पद्धतीमुळे म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना ५८० चौरस फूट तर मध्यम उत्पन्न गटातील रहिवाशांना एक हजार चौरस फुटांचे घर अधिकृतपणे मिळू शकते, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले. याबाबत मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी निरंजनकुमार सुधांशू यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एसएमएसलाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा