अनुदानाच्या रकमेत तीन सिलिंडर सरसकट सर्वाना दिल्यास राज्याच्या तिजोरीवर २५०० कोटींचा बोजा पडणार असल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काहीशी सावध भूमिका घेतली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ स्वपक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. खासदार, आमदार व श्रेणी एकचे अधिकारी वगळता सर्वानाच तीन सिलिंडर अनुदानाच्या रकमेत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
तीन सिलिंडर सरसकट सर्वाना देण्याचा निर्णय घेतल्यास पडणारा बोजा लक्षात घेता फक्त दारिद्रय रेषेखालील लोकांना ही सवलत देण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्यास विलंब लावला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तीन सिलिंडर देण्यास राष्ट्रवादी अनुकूल असल्याची भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविण्याकरिता राष्ट्रवादीने सरसकट सर्वाना ही सवलत मिळावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पुन्हा तीन सिलिंडर देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ही सवलत ठराविक गटांना देण्याऐवजी सर्वानाच मिळाली पाहिजे. खासदार, आमदार किंवा अधिकाऱ्यांना वगळा पण निर्णय लवकर घ्या, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. काँग्रेसमध्ये सध्या मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्ष यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याकरिताच प्रदेशाध्यक्षांनी सिलिंडरचा मुद्दा पुढे केला आहे. सिंचनाची श्वेतपत्रिका हिवाळी अधिवेशनात मांडताना त्यात किती पाण्याचा साठा झाला, खर्च किती वाढला, क्षमता किती होती ही सारी माहिती त्यात असावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अधिकाऱ्यांच्या चौकशीचा मुद्दा श्वेतपत्रिकेत येणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा