सोनसाखळी चोरांनी मुंबईत थैमान घातले असून रोज सरासरी पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. २०१० पासून मुंबई सोनसाखळी चोरीचे तब्बल ४,६८५ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अवघे ३० टक्के आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले होते. भरधाव वेगाने येणारे मोटारसायकलस्वार रस्त्यातून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावून पोबारा करतात. त्याचप्रमाणे रिक्षातील महिलांनाही लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी याबाबत मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यांतून माहिती मागवली होती. सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना उत्तर मुंबईतील दहिसर, बोरिवली, मालाड, मालवणी या परिसरात घडल्या आहेत. या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या १,२६६ घटना घडल्या आहेत. दक्षिण मुंबईत ३०७, पूर्व मुंबईत ९४१, मध्य मुंबईत २१८ आणि पश्चिम मुंबईत ७४८ गुन्हे दाखल झालेले आहेत. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्वात कमी म्हणजे ७ टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. माटुंगा आणि माहिम पोलीस ठाण्यात सर्वाधिक म्हणजे २०० हून अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सोन्याचे भाव वाढल्याने सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. जागोजागी सीसीटीव्ही बसवूनही पोलीस सोनसाखळी चोरीला पायबंद घालू शकलेले नाहीत.

Story img Loader