कचरावेचकांचा सवाल
देवनारच्या कचरा डेपोच्या आगीला कचरावेचक जबाबदार आहेत, असे सांगून मागील अनेक दिवसांपासून कचरावेचकांना कचराभूमीवर येण्यास मनाई केली जात आहे. ज्यांचे पोट कचऱ्यावर अवलंबून आहे, ते आपल्या रोजगाराला आग कसे लावू शकतील? असे अनेक प्रश्न सध्या कचरावेचक कामगार आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थाकडून विचारले जात आहेत.
सुमारे १३२ हेक्टर जागेवर वसलेल्या देवनार कचराभूमीवर २ ते ३ हजार कर्मचारी काम करीत असून कचरा डेपो बंद झाल्यापासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शांतीनगर, रफिकनगर, संजयनगर, गौतमनगर या भागातील कित्येक कामगार गेले अनेक दिवस देवनार कचराभूमीच्या प्रवेशद्वाराशी उभे राहून पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर कचराभूमी आम्हाला कामासाठी सुरू करण्यासाठी विनंती करीत आहेत. कचराभूमी बंद करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांकडून मागणी केली जात आहे. परंतु, ते करताना येथील कचरावेचकांच्या भविष्याचा विचार केला जात नसल्याचा आरोप वेगवेगळ्या संघटनांकडून केला जात आहे. कचराभूमीवर दिवसभर राबराब राबल्यानंतर या कामगारांना दिवसाचे २०० ते ३०० रुपये मिळतात. मात्र रोजंदारीवर जगणाऱ्या या कामगारांना पर्यायी रोजगारच नसल्याने गेले अनेक दिवस ते पालिकेच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.
वस्तुस्थिती
* दररोज साडेतीन ते चार हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो
* कचऱ्याचे सरासरी २० मीटर उंचीचे ढीग. काही ढीग ३० मीटपर्यंत उंच. त्यामुळे आग विझवणे अग्निशमन दलासाठी अडचणीचे.
* २०१५ मध्ये देवनारमध्ये १४ वेळा आग. त्यातील जानेवारी ते एप्रिलदरम्यानच ११ वेळा आग लागली होती.
* कचऱ्याच्या जैविक विघटनातून मिथेन वायू तयार होतो. मिथेन वायू ज्वलनशील असून कमी तापमानातही पेट घेतो. उन्हाळ्यात मिथेनने पेट घेतल्याने आग लागत असल्याचा पर्यावरणतज्ज्ञांचा अंदाज.
कचऱ्याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने नाही
विविध राजकीय पक्षांकडून देवनारचा कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली जात आहे. मात्र ही नेतेमंडळी येथील गरीब वंचित कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत आहेत. आयुष्यभर कचरा वेचणाऱ्या या कामगारांकडे इतर कौशल्य नाही, त्यामुळे शासनाने यांची विवंचना लक्षात घेऊन पावले उचलण्याची गरज आहे. आपल्याकडे कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी योग्य पद्धत नाही. त्यामुळे देवनार कचरा डेपोमध्ये दिवसेंदिवस कचऱ्याचे डोंगर वाढतच आहेत. सोसायटय़ांमधील कचऱ्यातून बायोगॅसची निर्मिती केली जाऊ शकते, यामुळे कचरा वाढणार नाही आणि बायोगॅसही उपलब्ध होऊ शकते. मुंबईमधील कित्येक सोसायटय़ांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. आम्ही मुंबईतील अनेक महाविद्यालयांमध्येही कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत आहोत.
– ज्योती म्हापसेकर, स्त्री मुक्ती संघटना
कचरावेचक पर्यावरणस्नेही
देवनार कचरा डेपोमध्ये गेली अनेक वर्षे हे कामगार कचऱ्याच्या वर्गीकरणाचे काम करीत आहेत. जे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असून या कामगारांना पर्यावरणस्नेही म्हणावे अशी इच्छा आहे. येथे काम करताना या कचरावेचकांना कॅन्सर, टीबीसारखे आजार होतात. काम करताना त्याचे हातपाय कापले जातात. मात्र या भागात राहणाऱ्या कामगारांना रोजगाराचा पर्याय नसल्यामुळे कचरा वेचण्यात त्यांचे आयुष्य गेले आहे. या कचरावेचकांच्या रोजगारासाठी दुसरा पर्यायही शासनाने मिळवून देण्याची गरज आहे.
– प्रकाश सोनावणे, फोर्स