मुंबई : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विहित केलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. गतवर्षी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. यंदा ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करताना राज्य सरकारने विहित केलेल्या नमुन्यातच प्रमाणपत्र सादर करावे, अशी सूचना करत केंद्राच्या नमुन्यातील प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नसल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने १० टक्के आरक्षण लागू केले आहे. त्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रमाणपत्राचे नमुने प्रवेश नियमावलीत प्रवेश प्रक्रियेपूर्वी दिले आहेत. त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हे प्रमाणपत्र दिलेल्या नमुन्यानुसारच असावे, असे स्पष्ट केले आहे. यानंतरही गतवर्षी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रातून ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते. त्या विद्यार्थ्यांना सेतू केंद्रावर आणि तहसील कार्यालयांमधून विहीत नमुन्यानुसार बदल न करता केंद्र सरकारच्या नमुन्यानुसारच दाखले देण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रलंबित ठेवले होते.

हेही वाचा :मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यंदा विशेष बाब म्हणून विद्यार्थ्यांनी सादर केलेले केंद्र सरकारच्या नमुन्यातील ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यास मान्यता दिली होती. मात्र आगामी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी योग्य नमुन्यातच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले.

हेही वाचा :फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?

प्रमाणपत्राच्या योग्य नमुन्याची अचूक माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या यादीत योग्य नमुन्याची लिंकही देण्यात आली आहे. त्यामुळे चुकीच्या नमुन्यात आलेली प्रमाणपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ews students need to submit ews certificate in the state government pattern not central government pattern mumbai print news css