अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणाऱ्या बोटीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा बोट दुर्घटनेशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही अशोक चव्हाणा यांनी केला आहे. विनायक मेटे यांच्या चौकशीच्या मागणीनंतर झालेला अपघात, घातपात तर नाही ना? असा संशय अशोक चव्हाण यांनी केला. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाताना स्पीट बोटीला झालेला अपघात चिंताजनक आहे. शिवस्मारकाचं काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेलं आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या शिवस्मारकाच्या कामाला आधीच दोन वर्षे उशीर झालाय. निवडणुकांच्या तोंडावर स्मारकाचे काम सुरू झाल्याचा देखावा निर्माण करण्याचे काम भाजपा सरकारकडून केले जात आहे. स्मारकाच्या कामात अनियमितता झाल्याचे मेटे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बोट दुर्घटना हा प्रकार केवळ अपघातच आहे की घातपात असा संशय जाणवू लागला आहे. यामागे विनायक मेटेंना शांत करण्याचा प्रयत्न आहे का? यासंदर्भात देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. निवडणुका जवळ येत असताना शिवस्मारकाचं काम जलद गतीनं होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे”, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जात असताना बुधवारी एका स्पीड बोटीला अपघात झाला. स्पीड बोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही बोट जात होती. या दुर्घटनेत बोटीतील सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex cm ashok chavan shiv smarak boat tragedy conspiracy