नवरात्रोत्सवादरम्यान ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे. शिंदे आणि विचारे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंनी सुरु केलेल्या या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील अशी शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे. आपल्या आईचा उल्लेख करत झालेल्या टीकेला युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
नक्की वाचा >> ‘खरी शिवसेना’ वाद : “सध्या शिंदेसाहेबांनी पक्षप्रमुख पदावर…”; दिपक केसरकरांचं पक्षप्रमुख पदाबद्दल महत्त्वाचं विधान
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी रश्मी ठाकरेंच्या ठाण्यातील या दौऱ्यासंर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना गर्दी जमवण्याचा प्रयत्न या निमित्ताने ‘शिल्लक सेने’कडून केला जाईल असं म्हटलं आहे. यासाठी मुंबईतील महिलांना ठाण्यात आणलं जाईल असंही शितल म्हात्रेंनी म्हटलं आहे. “पहिल्यांदा रश्मी वहिनी ठाण्याला जात आहेत. त्यामुळे महिला कमी पडताय किंवा गर्दी करावी या दृष्टीने ते महिलांना ठाण्याला जायला सांगताय. मुंबईतल्या माहिला ठाण्याला जाणार वहिनींसाठी तर मला वाटतं हे फारच केविलवाणं आहे,” अशी टीका शितल म्हात्रे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या समर्थकांचा ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करत शितल म्हात्रेंनी अशाप्रकारे गर्दी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणं यावरुनच लोकांचा पाठिंबा कोणाला असल्याचं समजतं असं सूचक विधान केलं. “अशापद्धतीने शिवसेनेत घडायला नको. कारण गर्दी आणि शिवसेना या दोन गोष्टींमध्ये अंतर पडत असेल तर शिल्लक सेनेनं हे समजून जावं की लोकांचा कल नक्की कुठे आहे,” असं शितल म्हात्रे म्हणाल्या आहेत.
नक्की वाचा >> मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून अमित शाहांचं अभिनंदन; म्हणाले, “पुढे सुद्धा अशी…”
रश्मी ठाकरेंच्या या भेटीदरम्यान गर्दी करण्यासाठी मुंबईतून महिलांना ठाण्यात आलं जाणार असल्याच्या शिंदे गटाच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना रश्मी ठाकरेंच्या या दौऱ्यासंदर्भात आणि त्यावरुन झालेल्या दाव्यासंदर्भात आदित्य ठाकरेंकडे विचारणा करण्यात आली. या प्रश्नावरुन आईच्या नावाने राजकीय टीका केली जात असल्यावरुन आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत शिंदे गटाला टोला लगावला. “ते लोक आईवर टीका करु शकतात. जे लोक राजकारण करतात ते यावरुन टीका करु शकतात. ती त्यांची संस्कृती आहे. ते आता दाखवून पण दिलं त्यांच्या एक-दोन नेत्यांनी. आम्ही सगळीकडे दर्शनसाठी जात आहोत. कुठेही राजकीय हेतू नाहीय,” असं आदित्य यांनी सांगितलं.