मुंबई : पावसामुळे जोगेश्वरी परिसरातील बैठ्या घरांतील नागरिकांचे व दुकानदारांचे बुधवारी प्रचंड नुकसान झाले असून या परिसरातील रहिवाशांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक अनंत नर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मजास नाला दुथडी भरून वाहू लागल्यामुळे या परिसरातील घरात व दुकानात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> तृतीयपंथीयाशी प्रेमसंबंध असल्याचे समजताच पत्नीनं मागितला घटस्फोट, पतीनं पत्नीच्या चेहर्यावर ॲसिड फेकलं
मुंबईत ठिकाठिकाणी सखल भागात बुधवारी पाणी भरले. काही तासातच अनेक भाग जलमय झाले. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस पडला. पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस अंधेरी पूर्व, मरोळ, जोगेश्वरी पूर्व या भागात झाला. त्यातच जोगेश्वरी पूर्वेकडी मजास नाला दुथडी भरून वाहू लागला. त्यामुळे नाल्याच्या जवळ राहणारे नागरिक, दुकानदार यांच्या घरांमध्ये व दुकानात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले व नुकसान झाले.
हेही वाचा >>> Mumbai Local Train Updates : पावसामुळे १०० लोकल फेऱ्या रद्द; मेल-एक्स्प्रेस आठ तास खोळंबल्या
रहिवासी, दुकानदार मध्यमवर्गातील असून त्यांना हे नुकसान परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनंत नर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून केली आहे. जोगेश्वरी पूर्व विभागात मेघवाडी, आदर्शनगर, गोणीनगर, टिळकवाडी, दवे कंपाऊंड, गांधीनगर, अंबिकानगर, महाराज भुवन, न्यु शामनगर येथील नाथ पै चौक, नवलकर मार्केट, चाचनगर, फ्रान्सिसवाडी आणि बांद्रेकरवाडी या ठिकाणी दुकानातील व घरातील सामान पाण्याखाली गेले होते. अनेकांनी आपल्या दुकानातील ओलाचिंब झालेला माल गुरूवारी रस्त्यावर आणून टाकला होता. त्यांच्या नुकसानाची पाहणी करून शासनाकडून त्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी नर यांनी पत्राद्वारे केली आहे.