लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षाचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. येत्या दोन दिवसांत आपली पुढील भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी जाहीर केले असले, तरी ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकींपाठोपाठ एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षालाही मोठी गळती लागल्याचे स्पष्ट झाले आहे. चव्हाणांबरोबर आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचेही सांगितले जात आहे.
हेही वाचा >>> श्वेतपत्रिकेतील आदर्श उल्लेखानंतर राजकीय भूकंप, सिंचन घोटाळ्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत बंड
लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने प्रत्येक मतदारसंघांत यश मिळवण्यासाठी अन्य पक्षातील कोणत्या नेत्यांचा उपयोग होईल, यादृष्टीने भाजपकडून नियोजन केले जात आहे. संबंधित नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करायचा की सहकारी पक्षात, याबाबतचे धोरणेही भाजपकडूनच ठरविली जात असल्याचे बोलले जाते. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचे काम केले आणि ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. एका मोठ्या नेत्याला भाजपने आपल्या गळाला लावल्यामुळे त्यांचे अनेक समर्थक काँग्रेसमधून फुटण्याची शक्यता बळावली आहे. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेले राधाकृष्ण विखे-पाटील, कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह यांना मोठी पदे दिल्याचा इतिहास आहे. आता अशोक चव्हाणांनाही मोठ्या पदाचे आश्वासन दिले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रविवारी बैठकीला हजेरी, सोमवारी पक्षत्याग
राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांच्या उपस्थितीत मुंबईत टिळक भवनात रविवारी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीस अशोक चव्हाण उपस्थित होते. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांचे पत्र टिळक भवनात येऊन धडकल्याने धक्का बसल्याचे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगितले.
अशोक चव्हाण हे रविवारपर्यंत काँग्रेस पक्षात सक्रिय होते. ते पक्ष सोडून जातील, असे अजिबात वाटले नव्हते. त्यांनी असा निर्णय का घेतला, हे कळायला मार्ग नाही. त्यांच्याबरोबर कोणीही पक्ष सोडून जाणार नाही.
– पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
सर्वच राजकीय पक्षांमधील जनतेशी दांडगा संपर्क असलेले अनेक बडे व चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्यास ते इच्छुक आहेत. आगे आगे देखिए होता है क्या…
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मी कालपर्यंत काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. भाजपमध्ये जाण्याबाबत अद्याप निर्णय घेतेलेला नाही. पक्षाने खूप काही दिले, हे मान्य… मात्र मीही पक्षासाठी खूप काही केले आहे. आपण कोणत्याही आमदाराच्या संपर्कात नाही. मात्र इतर काय निर्णय घेतील, हे मला सांगता येणार नाही. – अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री