मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची शुक्रवारी दादर पोलिसांनी चौकशी केली. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली.
झोपु प्रकल्पात स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५१ वर्षीय तक्रारदाराला दादरमध्ये सदनिका खरेदी करायची होती. डिसेंबर, २०१४ मध्ये तक्रारदार यांना एका आरोपीने प्रभादेवी येथील एका झोपु प्रकल्पात ३२ लाखांत सदनिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आरोपीने जून २०१५ मध्ये घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदार यांच्यासह त्यांच्या परिचयातील व्यक्ती अशा ९ जणांनी सुरुवातीला १५ लाख रुपयांप्रमाणे एकूण एक कोटी ३५ लाख रुपये अटक आरोपीला दिले होते. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराला सदनिका दिल्या नाही. तक्रारदार यांनी वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर आरोपींनी ३४ लाख ५० हजार रुपये तक्रारदार व त्यांच्या परिचित व्यक्तींना परत केले. याप्रकरणी उर्वरित रक्कम न मिळाल्यामुळे अखेर तक्रारदार यांनी जून २०२२ मध्ये दादर पोलिसांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली. त्यातील अटक आरोपीने चौकशीत पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आरोपीच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पेडणेकर या वीस मिनिटे पोलीस ठाण्यात होत्या. दरम्यान, पेडणेकर यांचा कोणताही जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. फक्त चौकशी करण्यात आली. त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.