बंडखोर आमदार संतोष बांगर यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी केली आहे. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरेंची भेट घेतली आणि हातात शिवबंधन बांधलं. याशिवाय विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी उद्धव कदम यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी अरविंद सावंत म्हणाले, “एकीकडे मातोश्रीवर रीघ लागली आहे. अनेक जिल्ह्यांमधून प्रवेश येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातून काही नेते पुन्हा आमच्याकडे आले आहेत. यात संतोष टार्फे, अजित मगर, सुभाष वानखेडे, थोरात, पुरी आणि बजरंग दलाचा समावेश आहे.”
उद्धव कदम म्हणाले, “मी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं कोकण प्रांतात काम करतो. शिवसेना हिंदुत्वाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मंदिराचा गाभा आहे. याचं महत्त्व आणि महात्म्य टिकून राहिलं पाहिजे. कारण मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल. महाराष्ट्र टिकला तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. म्हणून आतापर्यंत आम्ही संघ बंधनात काम करत होतो, आता छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवबंधनात काम करण्यास आलो आहे.”
हेही वाचा : शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील शिवसेना अन् भाजपच्या वेढ्यात
“सध्या आमच्या रुपाने शिवसेनेत येणाऱ्यांचं झऱ्याचं रुप आहे, मात्र काही दिवसात या झऱ्याचं रुपांतर एका मोठ्या प्रवाहात होईल. कारण सध्या विश्व हिंदू परिषद, संघ परिवारात प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, मात्र त्यांचा गैरवापर होतो आहे. वरिष्ठांकडून तो गैरवापर होतो आहे. धार्मिक गटबाजी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेविषयी अस्मिता आहे. काही दिवसांनी या झऱ्याचं रुपांतर प्रवाहात होईल,” असं कदम यांनी सांगितलं.