मुंबई : आरे वसाहतीमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला ५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून सदर कंत्राटदाराला पुढील दोन वर्षांसाठी पालिकेच्या कुठल्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या या निर्णयाबाबत महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच, रस्ते कामातील घोटाळे शोधण्यासाठी महानगरपालिकेने नवीन पथक तयार करावे, अशी मागणी रवी राजा यांनी केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांची पाहणी केली होती. त्यावेळी रस्ते कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
आरे वसाहतीमधील दिनकरराव देसाई मार्गाचे सिमेंट काँक्रीट व मास्टिक अस्फाल्ट सुधारणा काम सुरू आहे. या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येताच कंत्राटदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याप्रकरणी कंत्राटदाराला ५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून पुढील दोन वर्षे पालिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास कंत्राटदाराला बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. दरम्यान, रवी राजा यांनीही समाजमाध्यमावरून पालिकेच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले.
आरे वसाहतीमधील काँक्रीटीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे. तसेच, त्याला दोन वर्ष कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईसाठी महापालिकेचे रवी राजा यांनी आभार व्यक्त केले. संपूर्ण मुंबईत सर्वत्र सारखीच परिस्थिती असून काँकिटीकरणाच्या कामात सगळीकडे हलगर्जीपणा झाल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामातील घोटाळे शोधून कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने एक विशेष पथक तयार करायला हवे. तसेच, कंत्राटदारांना दोन नव्हे, तर किमान १० वर्षांसाठी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखले पाहिजे. अन्यथा ही परिस्थिती सुधारणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. केवळ एका प्रकरणात कारवाई करून महानगरपालिकेने थांबू नये. कारवाईची सत्रे सुरू राहिली तरच महापालिका रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर असल्याचा संदेश मुंबईकरांपर्यंत जाईल, असेही रवी राजा यांनी नमूद केले.
दरम्यान, महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरणाबाबत सातत्याने विरोधकांकडून टीका होत आहे. अनेक ठिकाणी रस्ते कामांसाठी खोदकाम करण्यात आल्यामुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होत असून यासंदर्भात वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात रस्ते कामांची पाहणी केली होती. त्यावेळी संथ गतीने सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरणामुळे मुंबईची दुर्दशा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.