मुंबई : मुंबई आणि क्रिकेट हे अतूट नाते आहे. मुंबई दौऱ्यावर असलेले ब्रिटनचे माजी पंतप्रधान यांनी रविवारी दक्षिण मुंबईतील ओव्हल मैदान आणि पारसी जिमखान्याला भेट दिली. यावेळी त्यांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला आणि युवा खेळाडूंबरोबर संवाद साधला.
भारतीय क्रिकेटच्या जडणघडणीचा साक्षीदार राहिलेल्या पारसी जिमखान्याच्या वर्धापन दिन सोहळ्याला सुनक यांनी हजेरी लावली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुनक म्हणाले की, ऐतिहासिक पारसी जिमखाना बहुसंख्य विलक्षण कामगिऱ्यांचा साक्षीदार आहे.
ओव्हल मैदान हे जगातील सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक आहे. याठिकाणी सर्वच वयोगटातील नागरिक खेळण्यासाठी एकत्र येतात. ओव्हल मैदान आणि पारशी जिमखान्याला भेट दिल्यानंतर रात्री सुनक यांनी वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० क्रिकेट सामन्यालाही हजेरी लावली. यावेळी त्यांनी दोन्ही संघांचे कर्णधार तसेच खेळाडूंशीही संवाद साधला.
टेनिस बॉल क्रिकेट खेळल्याशिवाय मुंबईचा दौरा पूर्ण होऊ शकत नाही. क्रिकेट खेळल्याशिवाय मुंबई दौऱ्यात मजा नाही. मुंबईत खेळताना फार वेळा बाद झालो नाही, या गोष्टीचा आनंद आहे. – ऋषी सुनक, माजी पंतप्रधान, ब्रिटन