मुंबई : दोन वर्षे कसून अभ्यास करून पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या नीट पीजी परीक्षेसाठी अमरावतीवरून पुण्याला दोन दिवस आधी आलो. हॉटेलचा खर्च १२ हजार रुपये झाला आणि अचानक रात्री मोबाईलवर नीट पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलल्याचा संदेश आला… हा संदेश पाहून माझ आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे. डॉ अभय पाटील याने नीट पीजी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काढलेले उद्गार अस्वस्थ करणारे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केवळ ११ तास अगोदर नीट पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. २३ जून रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र आता ती रद्द झाल्याचे व परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे सरकारकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रम, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचा पुढाकार

नीट पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी यंदा देशभरातून सुमारे २३ लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या देशभरातील सुमारे ७०० वैद्यकीय महाविद्यालयात १,०८,९४० जागा असून गेल्यावर्षी पेक्षा यंदा दोन लाख जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ७२० गुणांपैकी ७२० गुण मिळालेल्यांची संख्या ६७ असून या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर नीट पदवीसाठी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून सुमारे २० हजार विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेची मागणी केली आहे. देशभरात विद्यार्थी व राजकीय पक्षांकडून याबाबत आंदोलन होत असतानाच आता पदव्युत्तर नीटच्या परीक्षेवरून नवा वाद नको म्हणून केंद्र सरकारने नीट पीजीची २३ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला असून या विद्यार्थ्यांकडून आता तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी बहुतेक विद्यार्थी वर्ष ते दोन वर्षे तयारी करतात. ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थी परीक्षेच्या दोनचार दिवस आधी परीक्षा केंद्राजवळील हॉटेलमध्ये पदरचे पैसे खर्च करून राहातात. अनेकदा त्यांचे पालकही त्यांच्याबरोबर येतात. आता सरकारने नीट पीजी परीक्षा पुढे ढकलल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे तसेच मानसिक धक्काही बसल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-११०० कोटींची फसवणूक: अंबर दलाल प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल, मुंबईत छापे; डीमॅट, बँक ठेवी अशी ३७ कोटींची मालमत्ता गोठवली

सिंधुदुर्ग येथील आरोग्य विभागाच्या प्राथमिक केंद्रात काम करणार्या डॉ राजेंद्र याने परीक्षेच्या अभ्यासासाठी वरिष्ठांच्या सहकार्याने कामाच्या वेळा बदलून घेऊन अभ्यास केला. परीक्षेसाठी तीन दिवस रजा घेऊन ७०० किलोमीटर प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचला आणि त्याच्या मोबाईलवर परीक्षा रद्द झाल्याचा संदेश झळकला. हा संदेश पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकल्याची भावना त्याने व्यक्त केली.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सुमारे ४५ हजार जागा असून यासाठी जवळपास दोन लाख विद्यार्थी नीट पीजी ची परीक्षा देत आहेत. डॉ राजेश पाटील म्हणाले, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा संदेश जेव्हा रात्री १० वाजता पाहिला तेव्हा प्रथम मला वाटले की कुणीतरी चेष्टा करत आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाचे टिट्वीट पाहिले आणि झटकाच बसला.

आणखी वाचा-ओडीसातून आलेला गांजाचा मोठा साठा जप्त, एनसीबीच्या कारवाईत चौघांना अटक

निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ अभिजात हेलगे यांना परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविषयी विचारले असता, हजारो विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का असल्याचे ते म्हणाले. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे हीच एक मोठी तपश्चर्या असते. विद्यार्थी वर्ष दोन वर्षे जीव तोडून यासाठी अभ्यास करतात. मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करतात. दोनतीन दिवस आधी परीक्षा केंद्राजवळ हॉटेल किंवा मिळेल तेथे स्वखर्चाने राहातात. अशावेळी अचानक परीक्षा रद्द करणे ही गंभीर बाब आहे. केंद्र सरकारने याचा विचार करणे आवश्यक आहे. यातील काहींना नैराश्य येऊ शकते व त्याचा परिणाम त्यांच्या करियवर होऊ शकतो असेही डॉ अभिजित म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exam postponed only 11 hours before students suffering due to uncertainty of neet pg exam mumbai print news mrj