लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील आणि दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच ‘आयडॉल’मधील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना निकालाची वाट पहावी लागत आहे. काही विद्याशाखांच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये त्रुटी आढळल्या असून, विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील व संलग्नित महाविद्यालयातील विविध विभागांच्या पदव्युत्तर कला शाखा, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा, विधी शाखा आणि आयडॉल विभागातील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील कला शाखा, वाणिज्य शाखेच्या परीक्षा या डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ दरम्यान झाल्या. परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे उच्च शिक्षण व नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
हेही वाचा… मुंबई: अनैतिक संबंधातून पत्नीचा खून केल्यानंतर पाच वर्षांनी प्रियकराचीही हत्या; आरोपीला अटक
‘विविध अभ्यासक्रमांचे रखडलेले निकाल लवकरात लवकर जाहीर करून, विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा’ , अशी मागणी मुंबई विद्यापीठातील मनविसेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी पत्राच्या माध्यमातून विद्यापीठाकडे केली आहे.
‘मुंबई विद्यापीठातील नियमित एम.कॉम व एलएलएम या परीक्षांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर एम.ए व एम.एससी या परीक्षांच्या मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. आयडॉलमधील बी.ए, बी.कॉम, एम.ए व एम.कॉम या परीक्षा वार्षिक पद्धतीने होतात. सदर परीक्षांच्या मूल्यांकनाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून, निकाल हा लवकरच जाहीर करण्यात येईल’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे.