संदीप आचार्य

मुंबई: गोरगरीब रुग्णांना ताप, सर्दी आदी छोट्या आजारांसाठी घराजवळ मोफत उपचार मिळावेत तसेच मधुमेह व रक्तदाबासह आवश्यक चाचण्यांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये गेल्या सहा महिन्यात तब्बल सात लाख रुग्णांवर उपचार व आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेचा याबाबतचा धडाका लक्षात घेता ठाणे महापालिका, पुणे, नाशिक, पिंपरी- चिंचवड महापालिकांनीही मोठ्या संख्येने ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे अपेक्षित होते मात्र राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रात ‘आपला दवाखाना’च्या स्थापनेचे काम कुर्मगतीने सुरू आहे.

 मुख्यमंत्री झाल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी धारावी परिसरातील शीव-वांद्रे लिंक रोडनजिक असणा-या ओएनजीसी इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोननजिक आयोजित एका समारंभात दृकश्राव्य प्रणालीचा वापर करुन ५१ ठिकाणी उभारण्यात आलेल्या दवाखान्यांचे लोकार्पण एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यात लगेचच महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणखी ११ दवाखान्यांची भर घातली असून या ६२ दवाखान्यांच्या माध्यमातून अवघ्या पावणेदोन महिन्यात दोन लाखाहून अधिक रुग्णांची तपासणी केली होती. त्यानंतर आता एप्रिल अखेरीस गेल्या सहा महिन्यात सात लाख रुग्णांची तपासणी पालिकेने उभारलेल्या १५१ दवाखान्यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ संजीवकुमार यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या दवाखान्यात डॉक्टरांच्या माध्यमातून केवळ उपचारच केले जात नाहीत तर जवळपास १४७ प्रकारच्या चाचण्याही केल्या जातात. याशिवाय पालिकेच्या पॅनेलवरील डायग्नोस्टिक केंद्रांमध्ये सीटी स्कॅन, एमआरआय, मेमोग्राफी, एक्स-रे आदी चाचण्याही पालिका रुग्णालयात आकारण्यात येणाऱ्या दरांप्रमाणे केल्या जात आहेत. आतापर्यंत ३०,००० रुग्णांना विशेषज्ञांकडून आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आल्याचे डॉ संजीवकुमार म्हणाले.

प्रामुख्याने हे सर्व दवाखाने गरीबवस्ती वा झोपडपट्टी परिसरानजीक स्थापन करण्यात आल्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या साठ लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ घेता येणार आहे. साधारणपणे २५ ते ३० हजार लोकवस्तीसासाठी एक दवाखाना या प्रकारे दवाखाने उभारण्यात येणार असून सकाळी सात ते दुपारी दोन व त्यानंतर दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत हे दवाखाने चालविण्यात येत आहेत. या दवाखान्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक औषधनिर्माता व एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटी तत्त्वावार नियुक्ती करण्यात येते. गेल्या सहा महिन्यात आम्ही १५१ आपला दवाखाना सुरू केले असून २०२३-२४ मध्ये आणखी १२१ आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहेत. यातील ४० दवाखान्यांचे काम सध्या सुरु असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.

मुंबईतील काही दवाखान्याची दर्जोन्नती करून तेथे (कान-नाक-घसा तज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्री-रोग तज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचा रोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ञ आदी) विशेषज्ञांच्या सेवा पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत देण्यात येत आहेत. सदर दवाखान्यांमधून टॅब पद्धतीने व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशील नोंदविण्यात येत असल्याने बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे कामकाज हे कागदविरहित पद्धतीने (पेपरलेस) होत आहे. ही योजना कमालीची लोकप्रिय व गोरगरीब रुग्णांसाठी उपयुक्त ठरत अाहे. महत्वाचे म्हणजे मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे निदानही मोठ्या प्रमाणात होत असून त्यांनाही हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होत आहे.

ही योजना सुरु झाल्यानंतर प्रारंभी १ लाख लाभार्थी संख्या  ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर ७ जानेवारी २०२३ रोजी २ लाख,  ३ फेब्रुवारी २०२३ रोजी ३ लाख,  २२ फेब्रुवारी २०२३ रोजी ४ लाख, ६ मार्च २०२३ रोजी ५ लाख याप्रमाणे लाभार्थी टप्पा गाठला गेला. १ एप्रिल २०२३ रोजी संख्या ६ लाखांवर गेली होती.  त्यानंतर अवघ्या २१ दिवसात म्हणजे २२ एप्रिल २०२३ पर्यंत आणखी एक लाख लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे ही संख्या आता ७ लाख २ हजार २५२ वर  गेली आहे.

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे ६ लाख ७४ हजार १३० रूग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर ३०,००० रुग्णांना विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतील या एवढ्या महत्त्वाकांक्षी योजनेची एकीकडे मुंबई महापालिका मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करत असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे महापालिकेसह राज्यातील अन्य मोठ्या महापालिकांमध्ये मात्र ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ची अंमलबजावणी कुर्मगतीने का सुरु आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Story img Loader