लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुंबई विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा भोंगळ कारभार आणि परीक्षा नियोजनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना सातत्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यापीठाने मे महिन्यात होणाऱ्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. नवीन सुधारित तारखा व सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरगावी उच्च शिक्षणासाठी जाणे, नोकरी शोधणे आणि प्रवासाचे नियोजन करणे कठीण झाले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आर्थिक बाजार आणि सेवा, स्थावर मालमत्ता व्यवस्थापन, किरकोळ व्यवस्थापन, पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवस्थापन, आरोग्य, आदरातिथ्य आणि पर्यटन या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तृतीय वर्ष सहाव्या सत्राच्या परीक्षा ८ मे रोजी, पदव्युत्तर कला शाखेतील संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क, दूरदर्शन अभ्यास अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राच्या परीक्षा ९ मे रोजी आणि पदव्युत्तर कला शाखेतील समाजशास्त्र (हॉन्स) अभ्यासक्रमाची पहिल्या सत्राची परीक्षा ९ मे रोजी व तिसऱ्या सत्राची परीक्षा ही १० मे रोजी सुरू होणार होती. सर्व विद्यार्थी हे सविस्तर वेळापत्रकाची वाट पाहत होते. अनेकांनी गावी तर काहींनी फिरायला जाणे रद्द केले. मुंबई बाहेर राहणारे विद्यार्थी हजारो रुपये खर्च करून परीक्षेसाठी मुंबईत दाखल झाले. परंतु परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारखा या लवकरच जाहीर करण्यात येतील, असे परीक्षेपूर्वी अवघ्या ४ दिवसांआधी सांगण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. तर अनेक विद्यार्थ्यांना प्रवास खर्चामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागला. मात्र अद्याप सुधारित वेळापत्रक जाहीर न झाल्यामुळे परीक्षेसाठी मुंबईत यायचे की नाही? असा प्रश्न बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पडला आहे.

आणखी वाचा- मुंबई: मिठी नदी काठी मनोरंजन केंद्र आणि क्रीडा संकुल

‘सध्या विविध अभ्यासक्रमांचे रखडलेले निकाल लावण्याचे काम अंतिम टप्यात आहे. तर पुढे ढकलण्यात आलेल्या सर्व परीक्षांचे सुधारित सविस्तर वेळापत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार नाही. येत्या २ ते ३ दिवसांत नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exams of some courses have been postponed in mumbai university mumbai print news mrj