मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) हाती घेतलेल्या पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचे काम वेगात सुरू आहे. या रेल्वे मार्गात नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगद्याचे खोदकाम व इतर पायाभूत कामे सुरू आहेत. यापैकी मुंबई महानगरातील सर्वात जास्त लांबीच्या वावर्ले बोगद्याचे काम सुरू आहे. एकूण २.६ किमी लांबीच्या बोगद्याचे दोन किमीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या तिन्ही बोगद्याचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरातील लोकसंख्या वाढत असून, वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग व अतिरिक्त रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. एमआरव्हीसीच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल – कर्जतला थेट लोकल व इतर रेल्वे मार्गिका वाढवण्याचे काम सुरू आहे. सध्या पनवेल – कर्जतदरम्यान एकच मार्ग असल्याने मेल, एक्सप्रेस आणि मालवाहू रेल्वे याच मार्गावरून धावतात. या ठिकाणी पनवेल – कर्जत लोकल मार्ग तयार केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – बोरिवली येथे इमारतीच्या पाडकामादरम्यान दोन जखमी, राडारोडा चालत्या रिक्षावर पडला

या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन ३,१४४ मीटर लांबीचे बोगदे उभारण्यात येत आहेत. यापैकी वावर्ले हा बोगदा २,६२५ मीटर लांबीचा आहे. या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यास तो मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. तसेच या मार्गातील नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर आणि किरवली बोगद्याची लांबी ३०० मीटर आहे. या तिन्ही बोगदाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. यापैकी वावर्ले बोगद्याचे २,६२५ मीटरपैकी २,०३८ मीटर खोदकाम पूर्ण झाले. तर, नढाल बोगद्याचे पूर्णपणे खोदकाम झाले असून किरवली बोगद्याचे ३०० मीटरपैकी २३४ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.

पनवेल-कर्जत दरम्यान २९.६ किमी दुहेरी रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गात दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल उभे राहणार आहेत. या मार्गिकेसाठी २,८१२ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून डिसेंबर २०२५ पर्यंत दुहेरी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य एमआरव्हीसीने ठेवले आहे.

हेही वाचा – मुंबई : स्वच्छता मोहिमेसाठी महापालिका आयुक्त रस्त्यावर, अरुंद वसाहतींमध्ये जाऊन केली स्वच्छता

बोगद्याचे काम करताना त्यात उत्तम प्रकाश व्यवस्था, वायुवीजन यांसारख्या अनेक आधुनिक सुविधेने हा बोगदा सुसज्ज असणार आहे. – सुभाषचंद्र गुप्ता,अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी