मुंबई : मुंबईत भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या अमर महल – परळ दरम्यानच्या जलबोगद्याच्या प्रकल्पातील वडाळा – परळदरम्यानच्या ५.२५ किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचे खणनही पूर्ण झाले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते या जलबोगद्याचा ब्रेक थ्रू अर्थात मशीन जमीनीबाहेर येण्याचा क्षण साजरा करण्यात आला. हा संपूर्ण प्रकल्प एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. भविष्यात या जलबोगद्याद्वारे माटुंगा, वडाळा, परळ, त्याचप्रमाणे अंशतः भायखळा आणि कुर्ला विभागातील काही परिसराला पुरेसा व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
पाणी पुरवठ्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुंबईत अनेक ठिकाणी जलबोगदे तयार करीत आहे. त्याअंतर्गत घाटकोटपर पूर्व येथील हेगडेवार मैदान (अमर महल) ते प्रतीक्षानगर, वडाळा आणि तेथून पुढे परळच्या सदाकांत ढवण उद्यानापर्यंत ९.७ किमी लांबीचा जलबोगदा बांधण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या कामाअंतर्गत बोगदा खणण्याचे काम शुक्रवारी पूर्ण झाले. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पाअंतर्गत वडाळा – परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्यातील जलबोगद्याचे खणन पूर्ण झाले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) महेश पाटील, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प) पांडुरंग बंडगर यावेळी उपस्थित होते.
जलबोगद्याच्या खोदकामादरम्यान अनेक मोठ्या अडचणी आल्या होत्या. भूगर्भात मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले भूजल पाझर, वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यामध्ये खडक ढासळणे अशा प्रकारच्या खडतर आव्हानांचा मुकाबला करत महानगरपालिकेने दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम नियोजित वेळेत पूर्ण केले. करोनाकाळातही प्रकल्पाचे खोदकाम अविरतपणे सुरू होते. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर १०० किलोमीटर लांबीचे जलबोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर ठरले आहे.
पहिल्या टप्प्यातील हेगडेवार उद्यान – प्रतीक्षा नगरदरम्यानच्या ४.३ किलोमीटर लांबीच्या जल बोगद्याचे खोदकाम ८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आले होते. हे काम ८ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण झाले. तर प्रतीक्षा नगर – परळ या ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे खोदकाम १ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आले होते. ते आता पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण प्रकल्प एप्रिल २०२६ पर्यंत नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : मुलुंडमधील १७ इमारती टँकरच्या पाण्यावर अवलंबून, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हैराण
पाणी जपून वापरा – गगराणी
पाण्याच्या वहनासाठी जलबोगदे बांधणारी मुंबई महानगरपालिका भारतातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जलबोगद्यांद्वारे पाणी वहन केल्याने गळती व पाणीचोरीला आळा बसत आहे. एकूण ९० किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिट जलबोगद्यांतून दररोज पाणी आणले जाते. त्यात आता अमर महल – वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याची भर पडली आहे. मुंबईतील घराघरात पाणी पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेची महाकाय यंत्रणा २४ तास राबत आहे. उपलब्ध असलेल्या जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून मुंबईकरांपर्यंत पाणी पोहोचवले जात आहे. मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी केले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये-
१) या जलबोगद्याद्वारे एफ उत्तर (माटुंगा, वडाळा परिसर), एफ दक्षिण (परळ), अंशतः ई (भायखळा) आणि एल (कुर्ला) विभागातील काही परिसरातील नागरिकांना २०६१ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या १८ हजार कोटींच्या अटल सेतूला तडे; नाना पटोलेंनी समोर आणली दुरवस्था
२) हा जल बोगदा सुमारे १०० ते ११० मीटर इतक्या खोलीवर असून बोगद्याचा खोदकाम व्यास ३.२ मीटर आणि अंतर्गत काँक्रिटचे अस्तरीकरण झाल्यावर संपूर्ण व्यास २.५ मीटर इतका असणार आहे.