नववर्षांच्या स्वागतानिमित्त गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, मार्वे, गोराई बीच आणि मुंबईतील इतर ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरावयास जाणाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाने ३१ डिसेंबर रोजी रात्री जादा बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नववर्षांच्या स्वागतासाठी चौपाटय़ांवर जाणाऱ्यांना रात्री उशीरा आपापल्या घरी पोहोचणे सहज शक्य होणार आहे.
बसमार्ग क्रमांक. १ मर्यादित, १७ मर्यादित, १३२, १३३, २०३, २३१, २४७ आणि २९४ वर रात्री ११ वाजल्यापासून एकूण १५ जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, मार्वे, गोराई बीच, तसेच चर्चगेट रेल्वे स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वाहतूक अधिकारी, बसनिरीक्षक, त्याचप्रमाणे सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excees best buses will run on road in 31 night