गेले दशकभर मंत्रिपद भोगल्यावर नवी दिल्लीच्या रूक्ष वातावरणात जाणे म्हणजेच एकप्रकारे शिक्षाच, असा समज बहुधा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी करून घेतला आहे. यामुळेच खासदारांचे संख्याबळ वाढविण्याच्या उद्देशाने काही ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची पक्षाची योजना असली तरी आतापर्यंत छगन भुजबळ यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही मंत्र्याने स्वत:हून तशी तयारी दर्शविलेली नाही.
पुढील लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस किंवा भाजप आघाडीला बहुमताचा आकडा गाठणे कठीण जाईल, असे जनमत चाचण्यांचे अंदाज येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत तिसऱ्या आघाडीकडे सत्तेच्या चाव्या जाणार असल्यास शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरू शकतात. मात्र त्यासाठी १० ते १५ खासदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. नवे चेहरे देऊन लोकसभेच्या निवडणुकीत फायदा होत नाही, असा अनुभव गेल्या वेळी आला. यामुळेच काही ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात येईल, असे संकेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, गणेश नाईक, रामराजे नाईक- निंबाळकर, जयदत्त क्षीरसागर, गुलाबराव देवकर, फौजिया खान आदी मंत्र्यांची नावे घेतली जातात. याशिवाय विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचा शिरुर मतदारसंघासाठी विचार होऊ शकतो. असे असले तरी कोणत्याच मंत्र्याची स्वखुशीने लोकसभा लढण्याची तयारी दिसत नाही. पक्षाने आदेश दिल्यास बघू, असेच सर्वाचे खासगीत म्हणणे असते. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मात्र स्वत:हून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी, शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणात ताकद वाढविण्यासाठी राज्यातून त्यांना भक्कम साथ मिळणे आवश्यक आहे. यामुळेच नाशिक मतदारसंघातून आपण निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे, असे स्पष्ट केले.
जयंत पाटील यांचे नाव हातकणंगले मतदारसंघासाठी घेतले जात असले तरी ते स्वत: अजिबात इच्छुक नाहीत. ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी या वेळी त्यांना निवडणूक सोपी नसेल, असा अंदाज आहे. यामुळे ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नावाबाबत विचार होऊ शकतो. जलसंपदामंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नावाचा सातारा किंवा माढा मतदारसंघासाठी विचार होऊ शकतो. स्वत: शरद पवार हे लढणार नसल्यास माढा मतदारसंघाला निंबाळकर यांचे प्राधान्य राहील.
शिवसेना व भाजपचे काही खासदार संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात असला तरी सध्याच्या परिस्थितीत अन्य पक्षातील खासदार राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्याची शक्यता फारच कमी असल्याचे पक्षातच बोलले जाऊ लागले आहे. सत्ताधारी आघाडीच्या विरोधात वातावरण असल्यास अन्य कोणत्या पक्षातील विद्यमान खासदार राष्ट्रवादीत जाऊन स्वत:चे नुकसान करून घेणार नाही, असा अंदाज आहे.

Story img Loader