रिक्षा-टॅक्सीचालकांकडून अवाजवी भाडे आकारणी; सार्वजनिक वाहतूक नसल्याने रुग्ण, प्रवाशांचे हाल
नीलेश अडसूळ, लोकसत्ता
मुंबई : टाळेबंदीदरम्यान लोकल, बस तसेच मेट्रो वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असली तरी, अत्यावश्यक सेवा म्हणून रिक्षा, टॅक्सीच्या वाहतुकीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काही रिक्षा, टॅक्सीचालक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी किंवा रुग्ण यांना प्रवाससुविधा पुरवत आहेत. मात्र, यासाठी अवाजवी भाडे आकारण्यात येत आहे.
नायर रुग्णालयातील अॅनिमियाने त्रस्त असलेल्या २१ वर्षीय महिलेला पुढील उपचारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. नायर रुग्णालयात रुग्णवाहिकांची कमतरता असल्याने त्यांना पर्यायी वाहन शोधावे लागले. रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीचालकाने शीव येथे येण्यास होकार दिला; परंतु भाडे मीटरप्रमाणे न आकारता चारशे रुपये देण्याची मागणी केली. शीव रुग्णालय ते नायर रुग्णालय या दरम्यान मीटरनुसार साधारण दीडशे ते एकशे सत्तर रुपये होतात. ‘रुग्ण फारच वाईट स्थितीत असल्याने नाइलाजाने आम्ही चारशे रुपये द्यायला तयार झालो; परंतु अनेक गरीब रुग्ण उपचारांसाठी बाहेर पडत आहेत. अशा पद्धतीची पिळवणूक केली तर रुग्णांचा प्रवासातच जीव जाईल,’’ अशी प्रतिक्रिया संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
खेरवाडी येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या संतोष भोसले यांच्याकडूनही रिक्षा चालकाने दुप्पट भाडे घेतले. ‘सध्या घराबाहेर पडणाऱ्या लोकांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. प्रत्येकाकडेच खासगी वाहन नसते. अशा वेळी नेमका कशाने प्रवास करावा, असा प्रश्न पडतो,’असे ते म्हणाले.
मुंबईतील टॅक्सीचालकांच्या मोठय़ा संघटनेनेही अशा मनमानी दरआकारणीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘रुग्णांच्या सेवेसाठी टॅक्सीचालकांनी सेवेत राहणे योग्य आहे; परंतु चालकांनी परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये. टाळेबंदीमुळे संघटनेकडून सध्या सहकार्य होणे कठीण आहे. परंतु असे घडल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करावी,’ असे आवाहन मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे ए. एल. कोड्रोज यांनी केले आहे.
मदतीसाठी संपर्क
जादा भाडेआकारणीचा प्रकार घडल्यास प्रवाशांनी रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार पोलिसांकडे किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) करावी. पोलिसांशी १०० क्रमांकावर, तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी १८००-२२०-११० या क्रमांकावर संपर्क साधावा.
‘सध्या रस्त्यावर फिरणारे बरेचसे रिक्षा, टॅक्सीचालक अनधिकृत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही परवाने नाहीत. पैसे कमावण्याच्या हेतूने जर हे चालक रस्त्यावर उतरत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी.
– शशांक राव, मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सी मेन्स युनियन