असह्य महागाई, तुटपुंजा बोनस आणि त्यातही कमालीचा विलंब आदी कारणांमुळे झाकोळलेला दिवाळीचा माहौल गेल्या दोन दिवसांत मात्र झपाटय़ाने बदलला आहे. रविवार आणि लक्ष्मीपूजनाच्या आधीचा सोमवार या दोन दिवशी ग्राहकांनी भरभरून खरेदी केली. परिणामी मुंबई, ठाणे परिसरातील विविध बाजारपेठांमध्ये इतके दिवस सचिंत मुद्रेने बसलेल्या व्यापाऱ्यांच्या मुखावर मोकळे, प्रसन्न स्मित पसरले आणि वातावरणातही एक स्वच्छ, ताजा मोकळेपणा संचारला.
दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारी सुटीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी उसळली. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही दादर, अंधेरी, ठाणे, डोंबिवली, वाशी या मुंबई परिसरातील बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या होत्या.
मंगळवारी दिवाळीची पहिली पहाट आणि सायंकाळी लक्ष्मीपूजन असल्याने उटणे, सुगंधी तेल याबरोबरच फुलांच्या खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. ठिकठिकाणच्या बाजारपेठा व रस्त्यांवर पहावे तिकडे पिवळय़ा आणि केशरी रंगाच्या झेंडूच्या राशी आणि त्याभोवती ग्राहकांची गर्दी असे चित्र दिसत होते. दादरच्या फूल बाजारात तर पाऊल ठेवायला जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी उसळली होती. लक्ष्मीपूजनासाठी लाह्या व धूप, उदबत्ती, हळद-कुंकूची पाकिटे, वाती यासारखे पूजेचे सामान घेण्यासाठीही लोक बाहेर पडले.
धनत्रयोदशीनिमित्त सोने-चांदी खरेदीचा शुभ मुहूर्त सोमवारी दुपारीपर्यंत असल्याने सराफ बाजारांमधील सोन्या-चांदीच्या खरेदीची झुंबड सुरूच राहिली. सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसत असल्याने अनेकांनी दिवाळीनंतरच्या लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी आताच करून टाकली. शिवाय दर आणखी वाढणार म्हणजे चांगली गुंतवणूक ठरेल या दृष्टिकोनातूनही हजारो लोकांनी सोन्याचे वळे, नाणी घेण्यासाठी सराफ बाजार गाठला. त्यामुळे आर्थिक मंदीच्या चर्चा सुरू असताना सोन्या-चांदीच्या बाजारांत मात्र तेजीचे उत्साही वातावरण होते व सराफांसाठी दिवाळी चांगलीच शुभ ठरली.
या ना त्या कारणांमुळे कामाच्या गडबडीत शनिवार-रविवारी खरेदी करता आली नाही अशांचीही  फराळ, आकाशकंदील, सजावटीचे साहित्य, कपडे खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी झाली होती.
मिठाई आणि सुकामेव्यांच्या दुकानांमध्येही नानाप्रकारच्या मिठाया आणि फरसाण खरेदीसाठी लोकांची ये-जा सुरू होती. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये म्युझिकसिस्टिम आणि अत्याधुनिक एलईडी टीव्ही, वातानुकूलन यंत्रणा यांची
खरेदी जोरात दिसत होती. लक्ष्मीपूजनाच्या वा पाडव्याच्या मुहूर्तावर वस्तू घरपोच मिळावी यासाठी ग्राहक दुकानदारांकडे आग्रह धरत होते.         

Story img Loader