केवळ मुंबई, ठाणे किंवा पुणे या शहरी भागातच नव्हे तर राज्यात ठिकठिकाणी वैधमापनशास्त्र नियंत्रण विभागाकडून वजनमाप संदर्भात व्यापाऱ्यांवर कारवाई होत असते. परंतु, सध्या या विभागात तीन तालुक्यांमागे एकच निरीक्षक आहे. कामाचा आवाका मोठा असल्याने एकच निरीक्षक अपुरा पडतो. तरीही विविध मोहिमांच्या माध्यमातून ‘मापात पाप’ करणाऱ्या व्यापाऱ्यांना अटकाव करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. विभागाच्या कामाविषयी सांगतानाच ग्राहकांनीही आपल्या डोळ्यासमोर होणारी फसवणूक टाळण्यासाठी कसे जागरूक राहिले पाहिजे, हे विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
अमिताभ गुप्ता, नियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग

* वैधमापनशास्त्र यंत्रणेचे नेमके काम काय आहे?
वस्तू दोन पद्धतीने विकली जाते. एक म्हणजे उत्पादकाकडूनच पॅकिंग करून आलेली आणि दुसरी सुटय़ा स्वरूपात ग्राहकासमोरच वजन करून दिलेली. या दोन्ही प्रकारच्या खरेदीत ग्राहकाने वेष्टनावर संबंधित कंपनीने उत्पादनाविषयी जे दावे केले आहेत ते योग्य आहेत की नाहीत हे तपासून पाहिले पाहिजे. त्यापैकी वस्तूचे वजन किंवा माप ही जी काही बाब असते ती आमच्या अखत्यारित येते. वजन किंवा मापे करण्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे पारंपरिक पद्धतीचा वजनकाटा. दुसरा इलेक्ट्रॉनिक वजन काटा. यांच्याद्वारे सुटय़ा उत्पादनांची विक्री योग्य वजनमाप करून केली जाते आहे का हे आम्ही तपासत असतो. जी उत्पादने बंद पाकिटातून येतात त्यावर वस्तूचे नाव, वजन, किमती, उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि ग्राहक तक्रार निवारणासाठी संपर्क या सहा गोष्टी छापणे बंधनकारक आहे. ते तसे नसल्यास आम्हाला अशा उत्पादनांवर कारवाई करता येते. विक्रेत्यांना अशा बंद पाकिटावरील मूळ किमतीच्या ठिकाणी कुठलेही स्टिकर (सुधारित किंमत इत्यादी) लावतानाही आमची परवानगी घ्यावी लागते. यासोबत वजन मापे, इलेक्ट्रॉनिक वजन यंत्रे, धर्मकाटा आदींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरही आमचे नियंत्रण असते. तसेच, पाकीटबंद उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये जाऊन तेथील उत्पादनांची तपासणीही आम्हाला करता येते. एकूणच जिथे ग्राहकांचा संबंध येतो त्या त्या ठिकाणचे वजन मापांशी संबंधित व्यवहार ही आमच्या अखत्यारीतील बाब आहे.
* या विभागाला इतके अधिकार असूनही मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध शहरी भागातही ग्राहकांची सर्रास फसवूणक होताना का दिसते?
केवळ मुंबई, ठाणे किंवा पुणे या शहरी भागातच नव्हे तर राज्यात ठिकठिकाणी आमच्या विभागाकडून वजनमाप संदर्भात व्यापाऱ्यांवर कारवाई होत असते. परंतु, या विभागात सध्या तीन तालुक्यांमागे एक निरीक्षक आहे. आमचा कामाचा आवाका इतका मोठा आहे की एकच निरीक्षक अपुरा पडतो. त्यातून, मुंबई, ठाणे, पुणे, या शहरांमध्ये दुकाने, कारखाने यांची संख्या इतकी आहे की मनुष्यबळ फार तोकडे पडते. कारवाईसाठी वाहनेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे, कारवाईची गती काहीशी मंदावते. म्हणून आम्ही तालुकावर बाजारपेठांमध्ये शिबिरे आयोजित करून व्यापाऱ्यांच्या वजनमापांची तपासणी किंवा फेरपडताळणी करून दिली जाते. तसेच, समाजमाध्यमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय आमच्याकडून राज्यभर तपासणीसाठी मोहिमा राबवल्या जातात. नुकतीच स्टेशनरी दुकानांमध्ये आम्ही अशी मोहीम राबविली होती. त्याचा व्यापारीही धसका घेतात. तसेच, ग्राहकांनीही वजनमापांच्या संदर्भात जागरूक राहिले पाहिजे. मिठाई खरेदी करताना बॉक्सच्या वजनासहित मिठाई खरेदी करू नये, पेट्रोल वा डिझेल खरेदी करण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणाचा इंडिकेटर ०० दर्शवीत असल्याची खात्री करणे, पाकीटबंद वस्तू एमआरपी दरापेक्षा जास्त किमतीत खरेदी करू नये, दूध, रॉकेल खरेदी वा विक्री करताना मापे आत व बाहेर ठोकलेली नाहीत, याची खात्री करणे, सोने, चांदी आदी मौल्यवान वस्तूंचा व्यवहार करताना अधिक अचुकता दर्जाची वजने व तोलन उपकरणे यांचा वापर केला जातो आहे की नाही हे तपासणे आदी काळजी ग्राहकांनी घेणे आवश्यक आहे.
* पण अशा मोहिमांचा फायदा होतो का?
वैध विक्रेत्यांवर वचक बसविण्यासाठी अशा मोहिमांचा फायदा होतो. गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता-मुंबई’मध्ये आलेल्या वृत्ताची दखल घेत आम्ही दादरच्या भाजी मंडईत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली. या भागातील १६ जणांवर खटले दाखल करण्यात आले. पहिल्यांदा आम्ही दंड आकारतो. विक्रेत्याला समज दिली जाते. मात्र दुसऱ्यांदा तोच विक्रेता फसवणूक करताना आढळला तर त्याच्यावर ‘भारतीय ग्राहक संरक्षण कायद्या’अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. आतापर्यंत आम्ही महाविद्यालयीन उपाहारगृहे, शालेय साहित्याची दुकाने, विमानतळांवरील दुकाने, गॅस सिलेंडर पुरवठादार, बाटली बंद पाणी विक्री, मिठाईची दुकाने आदींवर कारवाया करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अशा सुमारे १७०० विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
* तुम्ही ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेता. परंतु, ग्राहकांना तक्रार करताना पुरावा द्यावा लागतो का?
– ग्राहकांनी शक्यतो दुकानदाराकडून अधिकृत बिल घेणे आवश्यक आहे. मात्र सगळेच ग्राहक याबाबत जागरूक नसतात. त्यामुळे फसवणूक झाली हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणून ग्राहकांनी शक्यतो वस्तू घेतानाच बिलाची मागणी करावी. याशिवाय जर का ग्राहकाकडे पुरावा नसताना त्याने तक्रार केली तरी त्याची पडताळणी आम्ही करतो. त्या विक्रेत्याची चौकशी आमच्या पथकाद्वारे केली जाते. ग्राहकांना सर्वतोपरी मदत करता यावी, हेच आमचे ध्येय आहे.
* फसवणूक झालेल्या ग्राहकाने कुठे तक्रार करावी?
आमच्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आम्ही खुले करून दिले आहेत. त्यासाठी दूरध्वनी, तक्रार निवारण केंद्रांपासून ते विविध समाजमाध्यमांची मदत आम्ही घेतो. या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्याकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन तिचे निवारण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमच्या मोहिमांची माहिती आम्ही देत असतो. याशिवाय फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही तक्रारींची दखल घेतो. ग्राहक ९८६९६९१६६६ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आणि २२८८६६६६ या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधून तक्रारी नोंदवू शकतात. तसेच आमच्या dclmms@yahoo.in या ई-मेल व ’legal metrology maharashtra consumer grievances फेसबुक पेजवरसुद्धा तक्रारी नोंदवू शकतात.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Story img Loader