मुंबई : वायू गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ ते ‘अतिधोकादायक’ श्रेणीत असताना धावणे, कठोर शारीरिक व्यायाम, श्रम टाळावेत असा सल्ला मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दिला आहे. मुंबईतील हवेचा स्तर ‘वाईट’ झाला असून या काळात नागरिकांनी आरोग्यविषयक कोणती काळजी घ्यावी याचीही नियमावली मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे.
मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आत. मुंबई महापालिकेने बोरिवली आणि भायखळा येथील बांधकामांवर पूर्ण बंदी घातली आहे. बांधकामाच्या ठिकाणांसाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर पालिका प्रशासनाने नागरिकांसाठीही आरोग्यविषयक सूचना दिल्या आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी हेही पालिकेने सांगितले आहे.
हेही वाचा – मुंबई : कुर्ल्यात मुलीने केली वृद्ध महिलेची हत्या
नागरिकांचाही सहभाग हवा…
वायू प्रदूषण टाळण्यासाठी शासन आणि प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचे सहकार्य व सहभाग मोलाचे आहे. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करावा. असे आवाहन पालिकेने केले आहे. शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, खासगी वाहनांचा वापर कमी करावा, उघड्यावर कचरा जाळू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा – ‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी
प्रदूषण कालावधीत आरोग्यविषयक सल्ला
- वायू गुणवत्ता निर्देशांक, वाईट ते अतिधोकादायक असलेल्या दिवसांमध्ये धावणे, कठोर शारीरिक व्यायाम / श्रम टाळावेत.
- वायू प्रदूषणाच्या कालावधीत फटाके फोडू नयेत.
- सिगारेट, बिडी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये.
- घरामध्ये स्वच्छता करताना झाडू मारण्याऐवजी ओल्या फडक्याचा वापर करावा.
- बंद घरामध्ये डासांच्या कॉइल, अगरबत्ती जाळणे टाळावे.
- निरोगी आहार फळे, भाज्या आणि पाणी इत्यादींचे सेवन करावे.
- श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अथवा नजीकच्या महानगरपालिका दवाखाना / रुग्णालयात जावे.
- प्रदूषण कालावधीत घराबाहेर जायचे असल्यास मुखपट्टीचा वापर करावा.