रोहिणी देवाशर यांची चित्रांना किंवा व्हिडीओ आदी माध्यमांत त्यांनी केलेल्या कलाकृतींना विज्ञानाचा आधार असतो. झाडांच्या वाढीच्या विविध टप्प्यांत सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या आकृती, सागरी जीवांचे आकार, समुद्रकाठच्या पुळणीवर दिसणारे केवलाकार, यांचा कुतूहलानं अभ्यास करून त्यावर आधारित चित्रं रोहिणी यांनी याआधी केली होती. त्यांची ती चित्रं विज्ञानातल्या आकृतींसारखी नव्हती.. म्हणजे, फक्त वैज्ञानिकांनीच ती पाहिली असती तर ‘या आकृतीत स्वतच्या कल्पना फार वापरल्यात’ अशी उणीदुणी त्यांनी काढली असती! ताज्या प्रदर्शनात रोहिणी यांचं गेल्या दोन वर्षांतलं महत्त्वाचं काम पाहायला मिळतं; त्यात मात्र विज्ञानाची अचूकता आणि कल्पनेच्या भराऱ्या यांचा मेळ निराळ्या पद्धतीनं घातला गेल्याचं दिसेल.
भायखळय़ाच्या जिजामाता उद्यानात (राणीबागेत) ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’त हे प्रदर्शन भरलं आहे. दहा रुपयांचं तिकीट काढून आत गेल्यावर संग्रहालय पाहायला तास-दीड तास (किमान अर्धा तास तरी) आणि रोहिणी देवाशर यांच्या कलाकृती पाहायला आणखी अर्धा तास असा वेळ देता येईल. त्याखेरीज संग्रहालयाच्या मागच्या भागात असलेल्या दालनांमध्ये पोलंडच्या चित्र-अभिकल्प कलेचं प्रदर्शन भरलं आहे. पोस्टरं आणि पुस्तकं असं त्याचं स्वरूप आहे. पुस्तकं पाहात बसल्यास इथंही तासभर लागू शकेल, इतकं ते दुसरं प्रदर्शन रसपूर्ण आहे. त्याआधी रोहिणी देवाशर यांच्या प्रदर्शनाबद्दल..
संग्रहालयामध्ये इतर कलावस्तूंबरोबरच एखादी नवी कलाकृती पाहायला मिळणं, हे ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’तल्या समकालीन कला-प्रदर्शनांचं खास वैशिष्टय़. संग्रहालयात शिरताच डाव्या हाताला (जिथं पूर्वी ‘बालकला दालन’ होतं, त्याच खोलीत) ‘क्लीअर स्काइज’ या शीर्षकाचे फोटो आहेत.. ते पाहून कदाचित फार काही वाटणार नाही; पण ‘आकाश’ या विषयावरल्या ज्या चार कलाकृती इथं आहेत, त्यापैकी ‘मेरिडियन – कालप्रवासातील प्रयोग’ या नावाची कलाकृती संग्रहालयाच्या मधोमध पाहता येईल. चार आडव्या शोकेससारख्या दर्शकपेटय़ांमध्ये काही मुद्राचित्रं ठेवली आहेत. वृत्तपत्रांत ‘या महिन्याचे आकाश’ म्हणून जशा आकृती छापून येतात, तशीच ही मुद्राचित्रं दिसतात. ‘२० ऑगस्ट २०१६’ या दिवसाचं रात्री साडेदहा आणि पहाटे साडेपाचचं आकाश, मग ‘२० ऑगस्ट ५०१६’ – तीच तारीख आणि सन ९०१६, १००१६ असं करत सन २१०१६ या वर्षांतल्या २० ऑगस्टच्या रात्रीचं आकाश.. अशी ही चित्रं आहेत! ही म्हटलं तर कल्पनेची भरारी, पण विज्ञानाच्या आधारेच. फक्त यातला विज्ञानाचा भाग हा जरा जुन्या वळणाचा आहे.. दुर्बिणींचा प्रसार झाला नसतानाच्या काळात ‘प्लॅनिस्फिअर’ नावाचं एक साधन आकाशाचे आडाखे बांधायला उपयोगी पडायचं, ते तंत्र वापरून ही चित्रं झाली आहेत. या चित्रांच्या आडव्या शोकेससमोरच, उभ्या फ्रेममध्ये हा ‘प्लॅनिस्फिअर’ आपण पाहू शकतो.
रेडिओ अँटेना आणि त्यावर पडणारी उन्हं, त्यातून सूर्याची दिसणारी प्रभा आणि तासागणिक बदलणाऱ्या, आभाळातल्या तब्बल ५२ निळ्या- काळ्या छटा असा एक व्हिडीओवरच्या मजल्यावरल्या तीन दालनांपैकी पहिल्यात आहे. याच पडद्यावर आणखी एक व्हिडीओ पाहता येतो, त्यातलं आकाश (कॅमेऱ्याच्या विशिष्ट लेन्समुळे) पृथ्वीसारखं गोल दिसतं आणि एकाच ठिकाणावरही दिवसाच्या प्रहरांनुसार रंग/प्रकाश हालचाली बदलत जातात.
दुसऱ्या दालनात ब्रिटननजीकच्या समुद्रामध्ये दुसऱ्या महायुद्धकाळात उभारले गेले ‘मॉन्सेल समुद्रकिल्ले’ दिसू लागतात. व्हिडीओवर या किल्ल्यांपर्यंतचा प्रवास टिपतानाच, एकेकाळच्या त्या ‘संरक्षकां’चा आत्ताचा एकाकीपणाही रोहिणी देवाशर यांनी टिपला आहे आणि मुख्य म्हणजे, याला लॉरा राइकोविच यांनी लिहिलेल्या निबंधातल्या काही वाक्यांची चपखल जोड देऊन भौतिकशास्त्र, भूमिती, भूगोल आणि काव्यरचना यांतल्या साधम्र्यावरलं भाष्य प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं आहे. त्या ‘संरक्षक किल्ल्यां’चं एक मोठं मुद्राचित्र रोहिणी यांनी केलं, तेही प्रचंड व्हिडीओ-पडद्याच्या मागल्या बाजूस मांडलं आहे.
याच संग्रहालयात मागचं आवार ओलांडून गेल्यावर असलेल्या दालनांमध्ये पोलंडमधल्या अनेक संस्थांच्या सहकार्यानं पोलिश डिझाइनचं प्रदर्शन भरलं आहे. तेही पाहावं असंच आहे. छापील उपयोजित चित्रांसाठी केलेल्या प्रयोगांचं वैविध्य त्यात पाहाता येतं. गणपतीच्या दिवसांत, चिंचपोकळी-लालबागची गर्दी-गोंगाट टाळून चार घटका सुखात आणि ज्ञानमय वातावरणात घालवायच्या असतील, तर ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’ची वाट धरणं उत्तम!