मुंबई : ‘चित्रपटसृष्टीतल्या सुमारे ५० वर्षांच्या कारकीर्दीची झळ माझ्यातल्या चित्रकाराला लागली,’ अशी कबुली देणारे अभिनेते आणि मूळचे चित्रकार अमोल पालेकर यांचे नवे चित्रप्रदर्शन १६ नोव्हेंबरच्या गुरुवारपासून मुंबईच्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. मुंबईच्या ‘जेजे’ कलाशाळेत शिकलेल्या आणि अभिनेता म्हणून ख्याती मिळवण्याआधी प्रदर्शनेही भरवलेल्या पालेकरांनी नऊ वर्षांपूर्वी अमूर्त-चित्रकार म्हणून पुन्हा सुरुवात केली, तेव्हा जलरंगांतील चित्रे त्यांनी प्रदर्शित केली होती. ताज्या प्रदर्शनातील चित्रे तैलरंगांत आहेत.

 तैलरंग हे लवचीक पण जाड, लोण्यासारखा रंग लावण्यासाठी उपयुक्त साधन; परंतु मिश्रकांच्या साह्याने त्यात तरलपणा आणता येतो. जलरंगांमधली चित्रे करताना पालेकरांनी पाण्यासारख्या प्रवाहीपणाचा मुक्त वापर केला होता. तसाच प्रवाहीपणा तैलरंगांत त्यांनी आणला असून बहुतेक चित्रे पांढऱ्या पार्श्वभूमीवर, तीन ते चार रंगछटांमधली आहेत. कॅनव्हास हे तैलचित्रांसाठी सुटसुटीत साधन म्हणून त्याचा वापर पालेकरांनी केला आहेच पण काही तैलचित्रे लाकडाच्या फळय़ांवरही आहेत. या फळय़ा बिजागरांनी सांधलेल्या असून त्या उलगडतात तेव्हा चित्राचा पूर्ण विस्तार दिसतो, किंवा त्याआधी एकेका छोटय़ा फळीत विभागलेले चित्राचे तपशीलही पाहता येतात. या फळय़ांची सांगड देव्हाऱ्यासारख्या आकारात घातली गेली आहे. प्रख्यात चित्रकार गुलाममोहम्मद शेख यांनी अशी ‘कावड’चित्रे यापूर्वी केली असली तरी ती अमूर्त नव्हती.

हेही वाचा >>>मुंबई पोलिसांची अमली पदार्थ तस्करीवर मोठी कारवाई, धारावी-दहिसरमध्ये ५ कोटीचा माल जप्त

जहांगीर आर्ट गॅलरीत एकाच वेळी पाच ते सहा प्रदर्शने सुरू असतात, परंतु ‘अमोल पालेकरांचे चित्रप्रदर्शन’ भरत असल्याची मौखिक प्रसिद्धी सुमारे तीन आठवडय़ांपासून झाली. पालेकरांना अमूर्तचित्रकार म्हणून भावणारा प्रवाहीपणा, एकेका चित्रचौकटीत दोन वा तीनच रंगछटांच्या मोठय़ा फटकाऱ्यांचे एकमेकांशी भिडणे आणि त्यातून नव्या छटा निर्माण होणे, ही दृश्य-वैशिष्टये जलरंगांप्रमाणे तैलरंगांतही जपली गेली हे महत्त्वाचे वाटले; कुणाला या प्रदर्शनातील चित्रविक्रीतून मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी दिली जाणार असल्याचे अप्रूप वाटले; तर कुणाला पालेकरांचे वय आणि चित्रांतूनही दिसणारा उत्साह यांचे गणित लोभस वाटले!

Story img Loader