मुंबई : मुंबई ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असून, मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर तसेच यमुनाताई हिर्लेकर चौक, माटुंगा येथे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार असून, प्रदर्शनामध्ये एक हजार नामवंत प्रकाशकांची दहा हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध असणार आहेत. कादंबरी ते विविध साहित्य, कार्टून चरित्र, ययाती, छावा, छत्रपती संभाजी महाराज, पुरुषार्थ, शहा जिजाई, छत्रपती शिवाजी महाराज, आज्ञा पत्र ही पुस्तकेही प्रदर्शनात उपलब्ध होणार असून, प्रदर्शन काळात ही पुस्तके वाचकांना २० टक्के सवलतीत उपलब्ध करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – मुंबई : रिक्षात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, हत्येचा गुन्हा दाखल
विलेपार्ले कल्चरल सेंटरतर्फे २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पू) येथे ‘हृदय सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम यांचा ‘मधुरव’ या मराठीची महती, तसेच नृत्य, काव्य व अभिनय हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा – मुंबई : हत्येच्या गुन्ह्यानंतर बडतर्फ करण्यात आलेला पोलीस पुन्हा सेवेत
मराठी भाषा गौरव दिन
मुंबई भाजपातर्फे २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मुलंड पूर्व येथील मराठा मंडळ सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ‘स्वरतरंग’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे रमेश शिर्के, योगाचार्य कृष्णाजी कोर्टी, सुकृत खांडेकर, डॉ. कुशल सावंत डॉ. रोहन प्रधान, कुमार सोहोनी यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, आमदार मिहिर कोटेचा उपस्थित राहणार आहेत.