निवडणुकीनंतर जनमताचा कौल जाणण्यासाठी घेण्यात येणारे ‘एक्झिट पोल’ या वेळी मात्र सपशेल दिशाभूल करणारे ठरले आहेत. भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश आणि राजस्थानात स्पष्ट बहुमत मिळेल, तसेच दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये थोडय़ाफार फरकाने विजयश्री मिळवता येईल, असे भाकीत बहुतांश चाचण्यामध्ये वर्तविण्यात आले होते, ते तसे खरे ठरलेही. मात्र हे भाकीत वर्तविताना, काँग्रेस आणि भाजपला मिळणाऱ्या जागांच्या आकडेवारीत प्रचंड तफावत असल्याचे स्पष्ट होत आहे. दिल्लीत काँग्रेस दहा जागाही मिळवू शकणार नाही, असे भाकीत एकाही जनमत चाचणीअंती पुढे आले नव्हते. टाइम्स नाऊ आणि सी व्होटर यांनी संयुक्त विद्यमाने घेतलेल्या चाचणीनुसार, दिल्ली येथे भाजपला ३१, ‘आप’ला ११ आणि काँग्रेसला २४ जागा मिळतील असे भाकीत वर्तवले होते. ओआरजी आणि इंडिया टुडे यांच्या सर्वेक्षणात, दिल्लीत काँग्रेसला २०, भाजपला ४१ तर ‘आप’ला ६ जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता. टुडेज चाणक्यने आम आदमी पक्षाला ३१, भाजपला २९ तर काँग्रेसला १० जागा मिळतील असा अंदाज वर्तविला होता आणि एबीपी न्यूज-नेल्सन यांच्या चाचण्यांमध्ये, भाजपला ३७, काँग्रेसला १६ तर आम आदमी पक्षाला १५ जागांवर मताधिक्य मिळेल असे सांगण्यात आले होते. मध्य प्रदेशातही सीव्होटरने भाजपाला १२८, काँग्रेसला ९२ जागा मिळतील असे, तर ओआरजी-आयटीने भाजपला १३८ आणि काँग्रेसला ८० जागा मिळतील असे भाकीत वर्तविले होते. एबीपी नेल्सनच्या सर्वेक्षणांती, भाजपला १३८ आणि काँग्रेसला ८० जागा मिळतील असे संकेत देण्यात आले होते.राजस्थानातील चित्रही फारसे वेगळे नव्हते. येथे काँग्रेसला किमान ४८ जागा तरी मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता, तर भाजपला जास्तीत जास्त १३६ जागांवर विजयश्री मिळू शकेल, असा होरा होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा